वेळेत वेतन मिळत नसल्याने आणि पीएफसह (PF) अन्य देणी थकविल्याच्या निषेधार्थ बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रवाशांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. बेस्ट उपक्रमाकडून संबंधित कंत्राटदारावर आर्थिक दंडाव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली जात नसल्याने कंत्राटी चालकांनी नाराजी व्यक्त केली असून, कंत्राटी चालकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या पीएफ निधीमध्ये १९० कोटींचा घोटाळा)
थकीत वेतन २५ मे पर्यंत देण्याचे आश्वासन
बेस्टने स्वमालकीच्या गाड्यांप्रमाणेच काही दिवसांपूर्वी कंत्राटी बसेसचा ताफा सेवेत समाविष्ट केला. एमपी ग्रुप या कंत्राटदारांनी त्यांच्या बसताफ्यासाठी कंत्राटी चालक नेमले आहेत त्यांना मासिक १८ हजार रुपये वेतन दिले जाते. एमपी ग्रुप या कंत्राटदाराने वेतन थकविले म्हणून बेस्टच्या कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, वडाळा, कुलाबा या पाच आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. त्यापैकी कुलाबा आगारातील काही चालकांचे वेतन कंत्राटदाराने दिले तर उर्वरित चालकांचा वेतन, देणी २५ मे पर्यंत देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिल्याने बहुतांशा चालकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र कुलाबा आगार वगळता उर्वरित चार आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेलेले नाही. हा तिढा सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन कायम सुरू ठेवले आहे.
कारवाई करा
काम बंद आंदोलन सुरू असल्याने बेस्टची एकही कंत्राटी बस रस्त्यांवर धावलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांना अन्य प्रवासासाठी अन्य पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. तसेच बेस्ट उपक्रमाने या कंत्राटदारावर दंडाव्यतिरिक्त कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community