सध्या अमलीपदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला जात आहे. विशेष म्हणजे यातील काही कारवाया भर समुद्रात होत आहे, अशीच मोठी कारवाई लक्षद्वीपच्या जवळ इंडियन कोस्ट गार्डने कारवाई केली आहे. या कारवाईत १ हजार ५२६ कोटी किंमतीचे २१९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालय आणि भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीपजवळील समुद्रात ‘ऑपरेशन खोजबीन’ अंतर्गत ही कारवाई केली. गेल्या वर्षभरात डीआरआयने तस्करीसाठी समुद्रात आणले जाणारे सुमारे २५ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले. ७ मे २०२२ रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाला गुप्त माहिती मिळाली होती की, लक्षद्वीपजवळील समुद्रात ड्रग्जची मोठी खेप भारताच्या सीमेवर पोहोचणार आहे. या माहितीवरून डीआरआयने भारतीय तटरक्षक दलाची मदत घेतली.
(हेही वाचा हिंदूंचे अस्तित्व संपवणारा प्रार्थनास्थळे कायदा १९९१! ऑनलाईन याचिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद)
हेरॉईनने भरलेली होती पाकिटे
१८ मे रोजी डीआरआयने तटरक्षक दलाच्या मदतीने प्रिन्स आणि लिटल-जिसस या दोन संशयास्पद बोटींचीही झडती घेतली. त्यावेळी त्यांना प्रत्येकी एक किलोची २१९ पाकिटे सापडली. ही सर्व पाकिटे हेरॉईनने भरलेली होती. ड्रग्ज मिळाल्यानंतर डीआरआय आणि तटरक्षक दलाने बोटी कोचीला आणल्या आहेत. गेल्या वर्षभरात एप्रिल 2021 पासून आतापर्यंत देशाच्या सागरी सीमेवरून विविध विमानतळांवर ३,८०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २६ हजार कोटी आहे.
वर्षभरात केलेल्या कारवाया
- १० मे २०२२ – दिल्ली कार्गो विमानतळावर ६२ किलो हेरॉईन जप्त
- २० एप्रिल २०२२ – कांडला बंदर (गुजरात) येथे २०.६ किलो जिप्सम पावडर जप्त
- २९ एप्रिल २०२२ – पिपाव बंदर (गुजरात) येथे धाग्यात गुंडाळलेले ३९६ किलो हेरॉईन
- सप्टेंबर २०२१ गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो हेरॉईन जप्त
- जुलै २०२१ न्हावा शेवा बंदरातून २९३ किलो हेरॉईन जप्त
- एप्रिल २०२१ तुतिकोरिन बंदरातून ३०३ किलो कोकेन जप्त करण्यात आले (कोकेनची आतापर्यंतची सर्वात मोठी खेप)
- फेब्रुवारी २०२१ तुघलकाबाद, दिल्ली येथून ३४ किलो हेरॉईन जप्त