मुंबईकरांसाठी पूर्वमोसमी पावसाचे ‘सरप्राईज’

149

वीकेण्डच्या मूडमध्ये रमलेल्या मुंबईकरांना शनिवारी सायंकाळी उशिराने पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यांचे सरप्राईज मिळाले. दक्षिण मुंबईत दादर, माहिम, माटुंगा या भागांत पूर्वमोसमी पावसाची एक मोठी सर काही मिनिटांसाठी येऊन गेली. त्यामुळे प्रवासादरम्यान घराबाहेर असलेले वीकेण्डमूडमधील मुंबईकर ओलेचिंब झाले. ढगाळ वातावरणातच दिवस सरणार असल्याच्या मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजाचा वरुणराजाने ठेंगा दाखवला.

लोकांची तारांबळ उडाल्याचे चित्र

दक्षिण मुंबईत मुख्यत्वे हलका पाऊस राहिला. शिवडी, परळ भागांत हलक्या पूर्वमोसमी पावसाचे थेंब दिसून आले. मानखुर्द आणि नवी मुंबईतही पावसाची मोठी सर धावून आल्याने लोकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. रात्री साडेनऊनंतर मुंबई व नजीकच्या भागांत अचानक पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. घाटकोपर, कुर्ला, पवई आदी भागांत मात्र रात्री थंड वा-यांचा प्रभाव जाणवत होता. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या रात्री आठच्या सुमारास जाहीर केलेल्या अंदाजानुसार, रविवारी मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र वीकेण्डची सुरुवातच पूर्वमोसमी पावसाच्या आगमनाने झाल्याने उद्या रविवारीही पाऊस पडतो की काय, अशी चर्चा मुंबईकरांमध्ये सुरु होती.

(हेही वाचा राज्यसभेसह आता विधान परिषदेसाठीही लॉबिंग सुरू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.