पूर्व द्रुतगती मार्गावरील कांजूर येथे असलेल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून हा उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
प्रवाशांची होत होती रखडपट्टी
पूर्व द्रुतगती मार्गावर असलेल्या कांजूर हायवेवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी हा उड्डाणपूल 13 मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या महामार्गावर होणा-या वाहतूक कोंडीचा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पूर्व द्रुतगती मार्गावर कांजूरमार्गपासून घाटकोपरपर्यंत, तर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड(जेव्हीएलआर)वर पवईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे प्रवाशांची तासन् तास रखडपट्टी होत होती. मात्र रविवारपासून हा पूल खुला झाल्यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
(हेही वाचाः बँक खातेधारकांची अशी होत आहे फसवणूक, सरकारने दिला सावधानतेचा इशारा)
वेळेआधीच दुरुस्ती पूर्ण
उड्डापुलाचे सांधे बदलण्याच्या कामासाठी हा पूल 13 मे ते 24 मे या काळात बंद राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र कर्मचा-यांच्या मेहनतीमुळे नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच या पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पूर्व उपनगरांकडे जाणा-या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. एमएसआरडीसीकडून या पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
(हेही वाचाः खिशाला परवडेल अशा खर्चात IRCTC देणार लेह-लडाखला भेटण्याची संधी)
Join Our WhatsApp Community