मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर त्यावर अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. पण आता राज ठाकरे यांनी आपल्या पुण्यातील सभेत हा दौरा रद्द करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. बृजभूषण सिंह यांचा विरोध हा सगळा सापळा असून, त्याला महाराष्ट्रातून कुमक पुरवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातून पुरवली कुमक
मी अयोध्या दौरा तूर्तास रद्द करायची घोषणा केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं पण काही जणांना त्याचा आनंद झाला. त्यावरुन अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. पण ज्यावेळी मी माझ्या अयोध्या दौ-याची तारीख घोषित केली त्याच्या काही दिवसांनंतरच एका खासदाराने मला अयोध्येला येऊ देणार नसल्याचे बोलायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष होतं. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा एक सापळा आहे. या सापळ्यात आपण अडकता कामा नये. या सर्व गोष्टींची सुरुवात करायला रसद महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली.
(हेही वाचाः काय वॉशिंग पावडर विकताय का? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा)
असा होता सापळा
ज्यांना माझा अयोध्या दौरा खूपत होता त्यांच्याकडून या गोष्टी करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांचं सरकार असताना त्यावेळी कारसेवक अयोध्येला गेले होते, तेव्हा त्यांना ठार मारण्यात आलं होतं. पण ज्या पद्धतीने ते वातावरण वाढवलं जात होतं, मी जर हट्टाने अयोध्येला जायचं ठरवलं असतं, तर माझे महाराष्ट्र सैनिक आणि हिंदू बांधव अयोध्येला आले असते. आणि जर तिथे काही झालं असतं तर त्यांच्यावर चालून जाणा-या मनसैनिकांवर कारण नसताना गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात सडवलं गेलं असतं. आणि त्याचवेळी इथे निवडणुका लावण्यात आल्या असत्या, हा सगळा सापळा असल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे.
(हेही वाचाः भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी राज ठाकरेंनी असं काही केलं, ज्याने…)
Join Our WhatsApp Community