चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे गुरूवारी रात्री डिझेल टँकर आणि लाकडांनी भरलेल्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख अर्थसहाय्य
या केलेल्या मागणीनुसार, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या अपघातानंतर आमदार सुधीर मुंनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारदे यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केली.
(हेही वाचा – औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी राज ठाकरेंचे मोदींना साकडे)
अशी आहेत मृतांची नावे
या अपघातात लाकडू असलेल्या वाहनातील चालकासह ६ मजूर, डिझेल असलेल्या वाहनातील तिघेजण अशा एकूण ९ जणांंचा होरपळून मृत्यू झाला. नऊपैकी पाच जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली गावातील होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता पाचही मृतांवर मोक्षधाम येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांनी टाहो फोडला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. चालक अक्षय सुधाकर डोंगरे (३०) बीटीएस प्लॉट बल्लारशा, मजूर प्रशांत मनोहर नगराळे (२८), कालू प्रल्हाद टिपले (३५), मैपाल आनंदराव मडचापे (२४),बाळकृष्ण तुकाराम तेलंग (४०),साईनाथ बापूजी कोडापे (३५), संदीप रवींद्र आत्राम (२२) सर्व राहणार दहेली व टँकरचालक हाफिज खान (३८) अमरावती, मजूर संजय पाटील (३५) वर्धा अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.