खिशात असेल क्रेडिट कार्ड तर गड्याचा विषयच हार्ड. होऊदे खर्च म्हणत हल्ली आपण सर्रास क्रेडिट कार्ड वापरतो. चंगळ करण्यासाठी उधारी करण्याचं लायसन्स म्हणजे क्रेडिट कार्ड. पण आपल्या पाकिटात असलेल्या या क्रेडिट कार्डचा जन्म, एका माणसाच्या पाकीट विसरण्यामुळे झाला होता.
(हेही वाचाः का चुकतात हल्लीच्या अंपायर्सचे निर्णय? माधव गोठोस्करांनी सांगितली कारणे)
न्यूयॉर्कमधील फ्रँक मॅक्नामारा नावाचा उद्योजक एका रात्री मेजर्स केबिन ग्रील या हॉटेलमध्ये जेवायला गेला. जेवून झाल्यानंतर जेव्हा नेहमीप्रमाणे बिल द्यायची वेळ आली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण पाकीट आणायला विसरलोय. आता काय करायचं, बहुतेक आपल्याला हॉटेलमध्ये भांडी घासायला लागणार असं त्याला वाटू लागलं. पण सुदैवाने त्याच्या पत्नीने येऊन बिल भरलं आणि त्याची सुटका झाली.
(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)
पण झालेल्या या प्रकारामुळे फ्रँक फारच खजिल झाला. आपल्यालाच नाही तर इतर कुणालाच यापुढे अशा प्रसंगातून जायला लागू नये यासाठी काहीतरी करायला हवं, हा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. तेव्हाच त्याच्या दिमागची घंटी वाजली. खिशात पैसे नसले तरी खर्च करता येईल, अशा एका कार्डची कल्पना त्याला सुचली. आपला वकील मित्र राल्फ शनायडर याला त्याने ही कल्पना सांगितली आणि मग जन्माला आलं जगातलं पहिलं क्रेडिट कार्ड. रात्रीच्या जेवणावेळी झालेल्या फजितीवरुन ही कल्पना सुचल्यामुळे या कार्डला डिनर्स क्लब असं नाव देण्यात आलं.
(हेही वाचाः मराठमोळ्या माणसाच्या सहीमुळे पाकिस्तानात नोटांना ‘किंमत’ होती, बघा कशी होती नोट)
त्यानंतर हे दोघे त्याच हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि जेव्हा बिल आलं तेव्हा खिशात पैसे असताना सुद्धा फ्रँकने हे कार्ड पुढे केलं. त्यानंतर हे कार्ड हळूहळू मार्केटमध्ये आलं. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळालेल्या या कार्डला नंतर चांगलीच लोकप्रियता मिळाली. आधी अमेरिका मग इंग्लंड, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये डिनर्स क्लबचं क्रेडिट कार्ड वापरायला लोकांनी सुरुवात केली. केवळ पाच वर्षांत या क्रेडिट कार्डचा विस्तार हा युरोप, आशिया आणि मध्य आशियापर्यंत पोहोचला. व्यापार, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांत या क्रेडिट कार्डचा वापर व्हायला सुरुवात झाली.
(हेही वाचाः RBI ने पाकिस्तानसाठी काम केले, कधी आणि का?)
सध्या जगभरातील 150हून अधिक देशांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर करण्यात येतो. मास्टर कार्ड, व्हिसा, अमेरिकन एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य कंपन्या विविध बँकांच्या माध्यमातून क्रेडिट कार्डची सेवा देत आहेत. जगात 2 अब्जाहून अधिक ग्राहक क्रेडिट कार्ड वापरत असल्याची माहिती नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून समोर आली आहे.