उद्ध्वस्त संसार उभे करण्याचे कार्य
गिर्यारोहणातून शिस्त आणि साहसाची गोडी लागते, तर अंगी भिनलेले साहस समाजाच्या कामी आले पाहिजे, या भावनेतून ‘रत्नदुर्ग’चे कार्य सातत्याने सुरू असते. गिर्यारोहण तसेच निसर्ग भटकंती दरम्यान झालेल्या अपघातातील अपघातग्रस्तांचा शोध आणि बचाव, गुहासंशोधन, हिमालयीन भ्रमंती, दुर्गसंवर्धन, निसर्गसंवर्धन, साहस शिबिरे यांबरोबरच रत्नदुर्गचे अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे कोकणात अनेकदा निर्माण होणाऱ्या भीषण पावसाळी पूरपरिस्थितीत प्राणांची बाजी लावून महिला, बालके, वृद्धांच्या जीवनसुरक्षेला प्राधान्य देऊन त्यांचे उद्ध्वस्त संसार उभे करण्यासाठी हातभार लावण्याचे कार्य रत्नदुर्ग सातत्याने करीत आहेत. याकरिता संस्थेस अनेक पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. चिपळूण आणि रत्नागिरी येथील भीषण पूरपरिस्थितीत ‘रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स’च्या कार्याची दखल घेऊन रत्नदुर्ग संस्थेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली कार्यरत रत्नदुर्ग या संस्थेस ‘शिखर सावरकर’च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त वर्ष २०२१ चा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.