छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर, शिवसेनेने पाठिंबा दिल्याचे तसेच, संभाजीराजे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर येत आहेत. यावर आता शिवसेनेची बाजू स्पष्ट करत, संजय राऊत म्हणाले की, आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. आम्ही दोन जागा लढवणार. दुसरा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा हवा असेल, तर छत्रपती संभाजी राजेंना शिवबंधनच बांधावे लागणार.
उमेदवार देऊन निवडून आणू
संजय राऊत यांनी सोमवारी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. आम्हाला संभाजी छत्रपती यांचा प्रस्ताव आला नव्हता. शिवसेना दोन जागा लढवणार आहे. शिवसेनेने दोन जागा लढवणे हा काही राजकीय अपराध नाही. शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री आहे. अशावेळेला सहा जागांची निवडणूक होत आहे. त्यातील दोन जागा आम्ही लढत आहोत. दोन्ही ठिकाणे उमेदवार देऊ आणि निवडून आणू असे संजय राऊत म्हणाले.
( हेही वाचा: बांठिया आयोगाचा वेळकाढूपणा सुरूच, तो उपक्रम त्वरित रद्द करा )
ही उद्धव ठाकरेंच्या ‘मन की बात’
राज्यसभेत आम्हाला आमचा एक खासदार वाढवायचा आहे. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही एक पाऊल मागे जाऊ. तुम्ही छत्रपती आहात. अर्थात निर्णय त्यांच्या हातात आहे, पण कोणत्याही परिस्थितीत दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील. ते पक्के शिवसैनिक असतील. ये मेरे मनकी बात नही, ये उद्धाव ठाकरेजी के मन की बात असल्याचे, संजय राऊत यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community