वीर सावरकरांचे विचार आत्मसात केले तर आपला देश प्रगतीप्रथावर जाईल – कीर्ती चक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे

172

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिली गेलेली अनेक पुस्तके आमच्यासाठी तसेच आमच्या कुटुंबासाठी प्रेरणास्थान आहेत. मी जेव्हा अंदमानात ३ वर्षे होतो तेव्हा वीर सावरकरांना जिथे ठेवले होते ती खोली पहायला जायचो. १५ ते ३० मिनिटे त्या खोलीत राहिल्यावर मी घामाने ओलाचिंब होत असे तेव्हा मनात विचार यायचा या खोलीत वीर सावरकर १० वर्षे कसे राहिले असतील. आज वीर सावरकरांचे विचार आपण आत्मसात केले तर आपला देश प्रगतीप्रथावर जाईल असा विश्वास कीर्ती चक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे यांनी व्यक्त केला. राळे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. जम्मू आणि काश्मीर येथे तब्बल १८ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणारे पराक्रमी कीर्ती चक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला.

( हेही वाचा : गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे सुशांत अणवेकर यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार २०२१’ प्रदान )

काश्मिरची सीमा भारतीय जवानांनी आपले बलिदान देत आखली 

पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर कीर्ती चक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वप्रथम वीर सावरकरांना अभिवादन करून उपस्थित मान्यवर, सुभाष दरेकर, कारगिल योद्धा नाईक दीपचंद यांचे आभार मानत सुभेदार संतोष राळे यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की, मी भारतीय सैन्यात २२ वर्ष सेवा केली. मी माझे कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकजण कोणत्याही माध्यमातून मातृभूमीची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असतो. या २२ वर्षात मी अनेक दहशतवाद्यांचा सामना केला. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा मी काम केले. आपण काश्मिरचा नकाशा पाहिला तर आपल्याला सीमा (बॉर्डर) दिसेल ही सीमा कोणात्याही आर्किटेक्चरने बनवली नसून ही सीमा भारतीय जवानांनी आपले बलिदान देत, दहशतवाद्यांचा सामना करत आखली आहे. आज भारतीय सुरक्षितपणे जीवन जगत आहेत ते केवळ भारतीय सैन्यांमुळेच असे कीर्ती चक्र पुरस्कार विजेते सुभेदार संतोष राळे यांनी सांगितले.

raale
सुभेदार संतोष राळे यांना आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित माजी पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, ग्रूप कॅप्टन निलेश देखणे, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वऱ्हाडकर.

१८ दहशतवाद्यांना ठार केले

२००५ मध्ये काश्मिरमध्ये घुसखोरी करणाऱ्या १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याच्या थरारक प्रसंगाचे वर्णन राळे यांनी यावेळी केले. काश्मिरमधील अतिथंड वातावरणात सेवा बजावणे जोखमीचे असते. हाडे गोठवणाऱ्या थंडीतही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रात्रीच दहशतवाद्यांचा पाठलाग केला. त्यांनी साहसी कामगिरी करत १८ दहशतवाद्यांना ठार केले. देशातील सर्व पालकांना विनंती करताना राळे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मुलांना चांगले मार्गदर्शन करावे, आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल त्यांना माहिती द्यावी. वीर सावरकरांबद्दल तुमच्या मुलांना माहिती द्या जेणेकरून येत्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.