स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विज्ञानाची कास सोडू नका असा संदेश कायम दिला. अगदी याचप्रमाणे DRDO चे सुद्धा आदर्श वाक्य ‘बलस्य मूलम् विज्ञानम्’ असे आहे. मी मिसाईल क्षेत्रात ३२ वर्षे कार्यरत आहे. आज या पुरस्काराचा स्वीकार करताना मला अतिशय आनंद होत आहे, अशा भावना ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल दिनकर राणे यांनी व्यक्त केल्या. अतुल राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
( हेही वाचा : संरक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे अतुल राणे यांचा ‘विज्ञान पुरस्कारा’ने गौरव )
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. जमिनीवरून आकाशात क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यासाठी ओळखले जाणारे रियल टाइम सिम्युलेशनचे परीक्षण तंत्र विकसित करण्याचे श्रेय अतुल राणे यांना जाते. अतुल राणे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला.
अतुल राणे म्हणाले की, ब्रह्मोसविषयी मी आज फार काही बोलणार नाही कारण आजचे प्रमुख पाहुणे ग्रूप कॅप्टन निलेश देखणे हे एअरक्राफ्टमधून ब्रह्मोस प्रक्षेपित करणारे पहिले व्यक्ती आहेत, त्यांच्या उपस्थितीत मी काय बोलावे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी अनेक जणांनी काम केले आहे, आमची एक संपूर्ण टीम होती. मी याचा केवळ एक भाग आहे. आता आम्ही देशाच्या संरक्षण, मिसाईल क्षेत्रात अधिक बलशाली होण्याच्या प्रयत्नात असून जगालाही आपला हेवा वाटेल अशी योजना आम्ही आखली आहे. त्यासाठी केवळ शास्त्रज्ञांचीच नाही तर तुम्हा सर्वांच्या मदतीची सुद्धा गरज आहे, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार विजेते अतुल राणे यांनी मान्यवर, पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार मानले.
Join Our WhatsApp Community