स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर… लहानपणापासूनच या नावाने अगदी झपाटून टाकलं होतं. इयत्ता सहावीत असताना त्यांची ‘ने मजसी ने ही’, कविता मराठीच्या पाठ्यपुस्तकात होती. त्या वयात त्यांच्या त्या कवितेचा अर्थ वाचून उमगेना. पण जेव्हा शाळेतल्या बाईंनी आणि घरी बाबांनी ती कविता समजावून सांगितली तेव्हा कुठेतरी ती थोडीफार समजली होती. कॉलेजमध्ये पुन्हा 11वीला हीच कविता अभ्यासली आणि तेव्हा एक लक्षात आलं की, आपण सावरकरांच्या कवितेतील केवळ शब्दांचा अर्थ शोधत आहोत, पण त्या कवितेमागची त्यांची राष्ट्रनिष्ठा, मातृभूच्या भेटीची ओढ, तिच्या स्वातंत्र्याचा घेतलेला ध्यास, या गोष्टी आपल्या अंगी भिनवल्या तर सावरकरांचं कुठलंही साहित्य समजून घेणं अवघड नाही.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या पुरस्कारांचे दिमाखदार सोहळ्यात वितरण)
सावरकरांच्या विचारांनी भारावलेले मन
माझी जन्मठेप वाचल्यावर तर सावरकरांच्या आयुष्यातले असंख्य पैलू नव्याने उमगले. त्यातील ‘प्रतिकूल तेच घडणार’ आणि मी त्यास तोंडही देणार हा सावरकरांनी दिलेला मूलमंत्र आजही अनेक बिकट प्रसंगी आठवला, की एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. मग पुढे दिनेश पेडणेकर निर्मित चॅलेंज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती असलेल्या हे मृत्यूंजय ही दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिगदर्शित सावरकरांच्या लंडन आणि अंदमानातील क्रांतिकार्याची ओळख करुन देणारी दोन्ही नाटकं करायचं भाग्य मला लाभलं. यावेळी दिग्पाल लांजेकरांच्या मार्गदर्शनामुळे माहीत नसलेले सावरकर आम्हाला कळले. त्यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यांच्याकडून सावरकरांच्या अनेक आठवणी ऐकायला मिळायच्या आणि नाटकाच्या तालमीला क्रांतिकारी चळवळीचं रूप यायचं. सावरकरांच्या विचारांनी भारावून जायला व्हायचं.
स्वातंत्र्यवीरांचं समाज क्रांतिकार्य
या नाटकांमुळे आणि सावरकरांच्या वाचलेल्या साहित्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं लंडन आणि अंदमानातलं क्रांतिकार्य फार जवळून अनुभवता आलं. पण सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मशालीसोबतच, जाती-पातीच्या अंधारात चाचपडणा-या समाजासाठी जी समाज क्रांतीची मशाल पेटवली, त्या मशालीने समाजात पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांचं दहन झालं. त्यांच्या याच सामाजिक क्रांतीच्या रत्नागिरी पर्वावर आधारित एक माहितीपट तयार करायची संकल्पना चंद्रशेखर साने सरांना सुचली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून लगेच ही कल्पना सत्यात उतरवायचं ठरलं आणि सहकार्यवाह स्वप्नील सावरकर आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी या माहितीपटाच्या लिखाणाची आणि निवेदनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली.
(हेही वाचाः वीर सावरकरांच्या विचारांचे विस्मरण झाल्याने स्वातंत्र्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागले – रणजित सावरकर)
‘समाजक्रांतिकारकाची यशोगाथा’
आधी मी बाळाराव सावरकरांचे रत्नागिरी पर्व वाचून काढले. जाती-पातीच्या बेड्यांतून हिंदू समाजाला मुक्त करण्याचं जे काम रत्नागिरीत सावरकरांनी हाती घेतलं होतं, त्या कार्याचं अगदी यथासांग वर्णन बाळाराव सावरकरांनी रत्नागिरी पर्वात केलं आहे. सावरकरांनी 1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या काळात केलेलं समाज प्रबोधनाचं कार्य हे त्यावेळची परिस्थिती बघता एका क्रांतिकार्यापेक्षा वेगळं नव्हतं, त्यामुळे या माहितीपटाचं नाव ‘समाजक्रांतिकारकाची यशोगाथा’असं देण्यात आलं. सावरकरांनी केलेलं हे कार्य इतकं विस्तृत आहे की ते तासाभराच्या माहितीपटात मांडणं अत्यंत अवघड होतं. पण चंद्रशेखर साने, स्वप्नील सावरकर, राजेंद्र वराडकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे कार्य शब्दबद्ध करणं सोपं गेलं. अखेर 23 मार्च 2022 ला आम्ही सगळे जण माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी रत्नागिरीला रवाना झालो.
रत्नागिरी विशेष कारागृह
अंदमानातून सुटका झाल्यानंतर सावरकरांना ज्या कारागृहात बंदिस्त करण्यात आलं होतं, त्या रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून चित्रीकरणाला सुरुवात झाली. यावेळी तुरुंगाधिकारी अमेय पोतदार यांनी सावरकरांच्या कारातीर्थाचा प्रवास जिवंत करुन सांगितला. या कारागृहात सावरकरांना ज्या यातना सोसाव्या लागल्या त्याचं वर्णन ऐकून आमच्या प्रत्येकाच्या मनाला असंख्य यातना होत होत्या. समाजातील जातीपातीच्या सात बेड्या मोडणा-या सावरकरांना रत्नागिरीच्या कारागृहात सात कुलूपांच्या आड बंदिस्त करण्यात आलं होतं. पण इंग्रजांनी जरी सावरकरांचं शरीर बंदिस्त करुन ठेवलं असलं तरी त्यांच्या प्रतिभेला आवर घालणं त्यांना कधीही शक्य नव्हतं. ज्या कोठडीत केवळ काही मिनिटं सुद्धा उभं राहणं शक्य नव्हतं, त्या कोठडीत सावरकरांनी सव्वा दोन वर्ष घालवली. अंदमानच्या सेल्युलर जेलचं दुसरं रुप म्हणजेच रत्नागिरीतलं हे विशेष कारागृह… हे आम्हाला त्यावेळी अनुभवास आलं.
(हेही वाचाः … तर भारतासह आजूबाजूच्या देशांचेही भाग्य बदलले असते – प्रवीण दीक्षित )
समाज प्रबोधनाची ज्योत
राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही या अटीवर सावरकरांना रत्नागिरीत इंग्रजांनी स्थानबद्ध केलं होतं. पण रत्नागिरीत सावरकरांनी समाज क्रांतिकार्याची धुरा हाती घेतली. त्यासाठी त्यांनी रत्नागिरीत ज्या-ज्या ठिकाणी जाऊन समाज प्रबोधनाची ज्योत पेटवली, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन चित्रीकरण करत होतो. सावरकरांचं हे समाज क्रांतिकार्य लोकांसमोर मांडण्यासाठी जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्याचं नक्कीच सार्थक होणार यावर आमचा विश्वास होता. या विश्वासामुळेच एक वेगळी स्फूर्ती मिळायची आणि प्रवासाचा, कामाचा शीण कुठच्या कुठे पळून जायचा.
(हेही वाचाः वीर सावरकरांकडे देशाच्या सुरक्षेविषयी धोरणात्मक दृष्टीकोन होता – अतुल भातखळकर)
माहितीपटामागचा प्रवास
आमचे छायाचित्रकार सतीश गरुड, त्यांचे सहाय्यक आणि या संपूर्ण प्रवासात ज्याने आमचं सारथ्य केलं तो निखिल कोचरेकर, राजेंद्र वराडकर, स्वप्नील सावरकर आम्ही सर्वच जण सावरकरांच्या या कार्याने भारावून गेलो होतो. रत्नागिरी, मालवण, वंगुर्ले असा प्रवास आम्ही केला. या प्रत्येक ठिकाणी आम्हाला मदत करणारी प्रत्येक व्यक्ती ही केवळ सावरकरांवर असलेल्या भक्तीपोटी आली होती. कुठलीही अपेक्षा न करता या प्रत्येकाने आम्हाला सावरकरांचं कार्य म्हणून सहकार्य केलं. या प्रवासावरुन परतत असताना आपणही या समाजासाठी काहीतरी करायला हवं ही उमेद आणि प्रेरणा घेऊन परतलो.
Join Our WhatsApp Community