लोणावळ्यामध्ये ड्यूक नोज या पॉईंटला ट्रेकिंगला गेलेला दिल्लीस्थित पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलात बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव फरहान शाह (वय -२४) आहे. फरहान हा अभियंता असून दिल्ली येथे वास्तव्यास आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली.
शोधमोहीम सुरू
लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव संरक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा दाट जंगलात शोध घेत आहेत. ड्यूक पॉइंटच्या परिसरात त्याचा शोध घेण्यासाठी समर्पित पथके तयार करण्यात आली. तर ड्रोनच्या सहाय्याने परिसर स्कॅन करण्यात येत आहे. पोलिसांसोबत बचाव पथकातील पन्नास सामाजिक स्वयंसेवक शोध मोहिमेत जुंपले आहेत. दुसरीकडे शहा परिवाराने एक पत्रक प्रसिद्धीसाठी काढले आहे ज्यात मजकूर दिलाय, जो कोणी बेपत्ता फरहानला शोधून काढेल त्याला एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे.
बेपत्ता तरूण शासकीय कामासाठी कोल्हापुरात आला होता. तो रोबोट बनवणाऱ्या कंपनीत काम करतो. त्याला गिर्यारोहणाची आवड असल्याने त्याने लोणावळ्यातील ड्यूक नोज पॉईंटला भेट दिली अशी माहिती लोणावळा शहर पोलीस सीताराम डुबल यांनी दिली.
Join Our WhatsApp Community