राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, छत्रपती संभाजीराजेंच्या घराण्याचा नक्की सन्मान करू पण शिवसेनेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील. तसेच हे बोलताना ते म्हणाले, एकीकडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा संकल्प संभाजीराजेंनी केला आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची विनंती ते करत आहेत. इतर पक्षांप्रमाणे सेनेनेही पाठिंबा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
(हेही वाचा – कर्नाटकात भीषण अपघात, लॉरी-बसच्या धडकेत 7 ठार, 26 जखमी)
दरम्यान, शिवसेनेकडून पाठिंबा असेल फक्त त्याआधी छत्रपतींनी शिवबंधन बांधावे. असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांना देण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव सोमवारी संभाजीराजेंनी फेटाळून लावला होता. यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास असून ते छत्रपतींच्या घराण्याचा नक्कीच सन्मान करतील , असेही संभाजी राजेंनी म्हटले. त्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते की, “माझी आणि मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आहे. ते छत्रपती घराण्याचा मान राखतील असा मला विश्वास आहे.” असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यावर दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
संभाजी राजेंनी व्यक्त केलेल्या अपेक्षेवर उत्तर देताना राऊत म्हणाले, आम्ही निश्चितच छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान करू,पण राज्यसभेच्या जागेचे दोन्ही उमेदवार शिवसेनेचे असतील, त्यामुळे शिवसेनेने संभाजीराजेंविरोधात उमेदवार निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे घोषणा करतील, असेही राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community