राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून जवळजवळ नाव निश्चित झाले आहे. कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यावरून आता या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांची मोठी कोंडी केली आहे. मात्र छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरवरुन मुंबईकडे रवाना झाल्याने छत्रपती संभाजी यांच्याविषयीच्या सस्पेन्स वाढलेला आहे. कारण छत्रपती संभाजी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अजून सहाव्या जागेवरील उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही.
राज्यसभेतील सहाव्या जागेबाबत गेल्या दोन दिवसांपासून मोठा सस्पेन्स आहे. संभाजीराजे शिवबंधन बांधणार की शिवसेना दुसरा उमेदवार जाहीर करणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून कोल्हापूरला निघून गेले. त्यानंतर मात्र शिवसेनेनकडून संजय पवार यांचे नाव चर्चेत आणले. संजय पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर संभाजीराजेंनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे ठरले आहे’, अशी एक ओळीची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर संजय पवार यांना सकाळीच मुंबईला येण्याचे आदेश दिले गेले. त्यानुसार सकाळीच संजय पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दुपारी ३ वाजता ते मुंबईत पोहोचले. शिवालय इथे जाऊन त्यांनी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली.
(हेही वाचा शिवसेनेने जाहीर केली संजय पवार यांना उमेदवारी; संभाजी राजेंना पाठिंबा नाहीच)
शिवसेनेचे राजेंवर दबावतंत्र!
शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करु, अशी थेट ऑफरच शिवसेनेने छत्रपती संभाजीराजेंना दिली होती. मात्र राजे काही तयार झाले नाहीत. २४ तासांच बऱ्याच मोठ्या घडामोडींनंतर सेनेने संजय पवार यांचे नाव जाहीर केले. खरे तर पवार यांचे नाव जाहीर करण्यामागे शिवसेनेची काही गणिते आहेत. आपल्या पक्षाचा आणखी एक खासदार राज्यसभेत असावा जेणेकरुन राज्यसभेतले बळ वाढेल आणि एखाद्या बिलावर निर्णय घेताना शिवसेनेचे मत महत्त्वाचे असेल, अशी स्पेस निर्माण होईल, असे सरळ गणित त्यापाठीमागे आहे.
महाआघाडीच्या नेत्यांची बैठक
राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने खास बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीची सबंधित बैठक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community