मुंबईकर जनतेसाठी बेस्टकडून खुशखबर

164

२५ मे २०२२ बुधवारपासून बेस्ट उपक्रमाच्या वीजग्राहकांना वीज बिल चलो अॅपद्वारे भरता येणार आहे. सुमारे १० लाख ५० हजार वीज ग्राहकांना त्यांचे वीज बिल सुलभरीतीने भरता यावे, या उद्देशाने बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने चलो अॅप द्वारे वीज बिल भरण्याची सोय बेस्ट उपक्रमाच्या वीजग्राहकांना बुधवारपासून उपलब्ध केल्याची घोषणा केली आहे. बेस्टच्या या नव्या निर्णयामुळे आता चलो अॅप वापरणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना बेस्ट उपक्रमाचे वीज बिल ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी  चलो अॅपचा वापर करता येणार आहे.

असे भरा चलो अॅपच्या माध्यमातून वीज बिल

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी असे सांगितले की, बेस्टचे चलो अॅप लोकांच्या सेवेत अर्पण केल्यापासून केवळ चार महिन्यांच्या कालावधीतच १५ लाख मुंबईकरांनी सदर अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चलो अॅप वापरकर्त्यांना वीज बिल भरणे सुलभ आणि अधिक सोयीचे ठरणार आहे. बेस्ट उपक्रमाने चलो अॅप द्वारे सदर ऑनलाइन वीज बिल भरण्याचा पर्याय वीज ग्राहकांसाठी खुला केल्यामुळे, त्यांना यापुढे वीज बिल भरण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वीज देयक भरणा केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. लोकेश चंद्र पुढे  म्हणाले की, वीज ग्राहकांनी चलो अॅपच्या मेनूबार वर जाऊन वीज देयकाचा पर्याय निवडावा. नंतर त्यांचा वीज ग्राहक क्रमांक त्या ठिकाणी नोंद केल्यावर, ऑनलाइन वीज बिल भरता येऊ शकते.

मुंबईकरांचा मोहिमेला चांगला प्रतिसाद

बेस्ट उपक्रमाने बेस्ट चलो अॅप द्वारे बेस्ट चलो स्मार्ट कार्डच्या रिचार्जची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चलो अॅपच्या वापरकर्त्यांना आता त्यांचा कार्ड क्रमांक नोंद करून कार्ड टॉप अप करता येऊ शकते. त्यानंतर सदर ऑनलाईन रिचार्ज केलेले कार्ड बस वाहकाच्या मशीनद्वारे ऍक्टिव्हेट करता येईल. बेस्ट उपक्रमाने मुंबईकर जनतेसाठी डिजिटल सेवेचे लोकार्पण करताना बेस्ट चलो अॅप बेस्ट चलो कार्ड आणि नवीन ७२ प्रकारच्या बेस्ट सुपर सेवर वाहतूक योजना पुढे चला या मार्केटिंग मोहिमेद्वारे प्रवाशांच्या सेवेकरता जारी केल्या आहेत. सदर विविध पर्यायांना प्रचंड प्रतिसाद देताना १५ लाख मुंबईकर जनतेने बेस्ट चलो अॅप डाउनलोड केले असून, दोन लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी बेस्ट चलो कार्ड खरेदी केले आहे.

( हेही वाचा: ‘बेस्ट’चे स्टेअरिंग महिलांच्या हाती! महिला बसचालकाची नियुक्ती )

सार्वजनिक सेवेकडे मुंबईकरांना आकर्षित करण्याचा बेस्टचा मानस

अलीकडेच लोकार्पित केलेल्या भारतातील पहिल्या डिजिटल वाहतूक सेवेच्या म्हणजेच एनसीएमसी कार्डच्या दाखल होण्यामुळे बेस्ट उपक्रम ही सार्वजनिक परिवहन सेवेमधील एक अग्रगण्य सार्वजनिक परिवहन संस्था ठरली आहे. आपल्या डिजिटल सुविधेमुळे मुंबईकर जनतेचा प्रवास सुखकर करण्यासोबतच जास्तीत जास्त मुंबईकरांना सार्वजनिक परिवहन सेवेकडे आकर्षित करण्याचा बेस्टचा मानस आहे. यापुढे तिकिटांच्या कागदावर होणारा खर्च तसेच रोख रक्कम हाताळणीचा खर्च देखील कमी करण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.