गोंदियातील बोंडगादेवी गावात मंगळवारी सायंकाळी उघडा दरवाजा पाहून बिबट्या थेट घरात शिरत पोटमाळ्यावर जाऊन बसला. सुदैवाने यावेळी घरात कोणीच नव्हते. या बिबट्याला वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत दरवाज्यापर्यंत बोलावून वनविभागाने जेरबंद करुन रात्री नैसर्गिक अधिवासात सोडले.
बिबट्याला जेरबंद करुन नैसर्गिक अधिवासात सोडले
गोंदिया जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने, दिवसाढवळ्याही बिबट्यांचे दर्शन होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी रस्त्यावरही बिबट्या आढळला होता. लॉकडाऊन काळापासून वन्यप्राण्यांनी गोंदियातील मानवी वस्तीजवळ संचार वाढवलेला असताना, थेट बिबट्या घरात घुसल्याचा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे वनाधिका-यांनी सांगितले. बोंडगादेवी या गावातील नामदेव बोरकर यांच्या घरात कोणीच नसताना, दरवाजा उघडा पाहत बिबट्या घरात घुसत थेट पोटमाळ्यावर चढला. याबाबत गावात माहिती पसरताच दुस-या गावातील माणसेही बिबट्याला पाहण्यासाठी जमली. मोठ्या संख्येने माणसांची गर्दी पाहता पोटमाळ्यावर चढलेल्या बिबट्याला जेरबंद करणे वनाधिका-यांसाठी अजूनच कठीण होऊन बसले. त्यांनी बिबट्याला मोठमोठ्याने आवाज देत, विचलित करायला सुरुवात केली. तब्बल साडेतीन तासांनी बिबट्या दरवाज्याजवळ येताच वनाधिका-यांनी दरवाजाजवळ लावलेल्या पिंज-यातच बिबट्या शिरला. दरवाजाची वरची बाजू लाकडी पाट्यांनी बंद केल्याने बिबट्याला पळायला मार्ग उरला नाही.
वनविभागाच्या वन्यप्राणी बचाव पथकाने बिबट्याची वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिका-यांकडे त्याची रवानगी केली. अंदाजे साडेतीन वर्षांच्या मादी बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून न आल्याने तिला तातडीने रात्रीच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
( हेही वाचा: निदान रुग्णाची आर्त हाक तरी ऐका!; परिचारिकांच्या आंदोलनाला वृद्धाचा पाठिंबा )
बेशुद्ध न करता पकडणे आव्हानात्मक
मानव-बिबट्या संघर्षात बघ्यांची वाढती गर्दी वनाधिका-यांना बचावकार्यात बरेच अडथळे निर्माण करते. कित्येकदा वन्यप्राणीही माणसांची गर्दी पाहून स्वसंरक्षणासाठी नजीकच्या माणसांवर हल्ला करतो. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी वन्यप्राण्याला बंदुकीतून बेशुद्ध करण्याचे औषध भरुन इंजेक्शनच्या माध्यमातून बेशुद्द केले जाते. त्यानंतर वन्यप्राण्याला पकडून वनाधिकारी जेरबंद करतात. मात्र गोंदिया वनविभागाने बेशुद्ध न करता बिबट्याचे लक्ष विचलित करण्यासाठी मोठमोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली. अखेर बिबट्याच स्वतःहून पोटमाळ्यावरुन खाली उतरत पिंज-यात आला.
Join Our WhatsApp Community