जम्मू-काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण यानंतर आता देशातील सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट जारी केला आहे. यासिन मलिकला झालेल्या शिक्षेविरोधात आता दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ला करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशाच्या गुप्तचर विभागाकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत हे हल्ले घडवून आणण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अलर्ट जारी
दिल्लीतील तिहार जेलच्या जेल नं.7च्या वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या निषेधार्थ दिल्ली एनसीआरमध्ये हल्ले घडवून आणले जाऊ शकतात, असा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या व्यतिरिक्त सुमारे 6 ते 7 संवेदनशील अलर्ट दिल्ली पोलिसांना प्राप्त झाले आहेत.
(हेही वाचाः यासिन मलिकला जन्मठेप)
सीमेपलिकडून कारवाई होण्याची शक्यता
ज्यादिवशी मलिकला एनआयए न्यायालयाने दोषी ठरवले त्याच दिवसापासून दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासिन मलिकला झालेल्या शिक्षेचा सूड उगवण्यासाठी त्याच्या समर्थकांकडून राजधानी दिल्लीला निशाणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमेपलिकडून या दहशतवादी कारवाईचा कट रचण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहे यासिन मलिक?
- देशविरोधी कारवाया केल्याचा यासिन मलिकवर आरोप
- दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिक दोषी
- जम्मू-काश्मिरमधील फुटीरतावादी नेता
- जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख
- ही संघटना बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA)अंतर्गत दहशतवादी संघटना आहे
- त्याने 1983 साली टाला पार्टीची स्थापना करुन, त्यानंतर इस्लामिक स्टुडंट लीगच्या माध्यमातून काम केले होते
- मुफ्ती सईदच्या मुलीच्या अपहरणाचा आरोप
- काश्मिरी तरुणांना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे