दोन वर्षांनंतर होत असलेल्या आषाढी यात्रेला यंदा मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा या वारीदरम्यान महिलांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : मुंबईप्रमाणे अन्य कोणत्या भागात आहे सहप्रवाशांना हेल्मेटसक्ती?)
विशेष सुविधा
वारी काळात दर १० ते २० किलोमीटर अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय/स्वच्छतागृह आणि न्हाणी घराची व्यवस्था असावी तसेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे. असे महिला आयोगाने सांगितले आहे. या वारीसोबत स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक मंदिर परिसराच्या दर्शनी भागात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी लावावेत असे महिला आयोगाने सांगितले आहे.
पत्राद्वारे निर्देश
या सर्व सुविधा वारीदरम्यान महिला वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील याबाबतचे निर्देश पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू-आळंदी-पंढरपूरात दाखल होतात. यातील महिला वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
Join Our WhatsApp Community