नोंदणीकृत कंपनीच्या नावे भलत्याच बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशो या ऑनलाईन अॅपवर सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत आढळून आला. मंगळवारी २४ मे रोजी जुहू आणि पुण्यात बनावट सौंदर्यप्रसाधने बनवणा-या ग्रुमिंग एन्टरप्राईजेस या कंपनीवर धाड टाकली असता त्यांनी विनापरवाना बनावट पद्धतीने बनवलेली सौंदर्य प्रसाधने ऑनलाईन तसेच ब्युटी पार्लरमध्ये थेट विकल्याचे चौकशीअंती समोर आले. त्यामुळे ऑनलाईन सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीपासून सावधान रहा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
( हेही वाचा : मुंबईतील शुक्रवारची पाणीकपात रद्द )
२९.४४ लाखांचा माल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला
अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई शाखेच्या टीमने एका सलोनला भेट दिली असता ही बनावट उत्पादने व निर्मिती कंपनीबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर २४ मे रोजी मुंबईतील जुहू येथील ग्रूमिंग एन्टरप्राईजेस या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. संबंधित कंपनीने भिवंडीतील एलिगंस कॉस्मेटिक्स या कंपनीच्या नावाचा व इतर कागदपत्रांचा वापर करुन बनावट सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय सुरु केला होता. एलिगंस कॉस्मेटिक्स कंपनीला केवळ दोन वेगळ्या प्रकारच्या पेट्रोलियम जेली बनवण्याची अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. जुहूतील धाडीत एलिगंस कंपनीच्या नावे शॅम्पू, कंण्डिशनर, हेअर वॉश, केसांच्या उपचारांसाठी आवश्यक कॅरेटीन उपचार पद्धतीची उत्पादने बनवली जात होती. जुहूतील कंपनीच्या अधिका-यांच्या चौकशीत पुण्यातील वाकडच्या शाखेतही बनावट सौंदर्यप्रसाधनांची उत्पादने घेतली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना मिळाली. दोन्ही ठिकाणांहून २९.४४ लाखांचा माल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला.
Join Our WhatsApp Communityबनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री अॅमेझोन, मिशो तसेच फ्लिपकार्टवरही होत असल्याचे आम्हांला चौकशीअंती समजले. ग्राहकांनी ऑनलाईन खरेदीतून मिळवलेल्या उत्पादनांवरील क्यूआरकोड तपासून घ्यावा. सलोनला भेट देणा-या ग्राहकांनीही शरीरावर वापरल्या जाणा-या उत्पादकांची माहिती तपासणे गरजेचे आहे.
-गणेश रोकडे, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग, अन्न व औषध प्रशासन