धारावी येथील कथित बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोन भावांना १० दिवसांतच पुराव्याअभावी सोडून देण्याची वेळ धारावी पोलिसांवर आली आहे. या दोघांना सोडून देण्यात आले असले तरी अद्याप त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली नसून, या प्रकरणाची सत्यता आणि पुरावे तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधिका-यांनी दिली आहे.
शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार
धारावी परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षाच्या नवविवाहितेने १० मे रोजी धारावी पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीत दुपारी ४ च्या वेळी घरात कोणीही नसताना, दोघे जणांनी बळजबरीने घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवल्याचे म्हटले आहे. त्यापैकी एकाने बलात्कार केला तर दुसरा व्यक्ती मोबाईल फोनमध्ये बलात्काराचा व्हिडिओ काढत होता, अशी माहिती पीडितेने पोलिसांना दिली होती. प्रकरण गंभीर असल्यामुळे धारावी पोलिसांकडून पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून, दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(हेही वाचाः बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक)
सीसीटीव्ही फुटेजवरुन उलगडा
पीडित महिला ही आरोपींना ओळखत नसल्यामुळे तिने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी तपास सुरू केला. धारावी ९० फुटी रोडवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानंतर पीडितेने हेच दोघे आरोपी असल्याची माहिती पोलिसांना दिली. या दोघांचा शोध घेऊन पोलिसांनी विलेपार्ले येथून दोन भावांना १५ मे रोजी संशयित म्हणून अटक केली होती.
आयुक्त कार्यालयावर मोर्चा
संशयित आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. त्यांचा गुन्ह्यात स्पष्ट सहभाग असल्यामुळे दोघांना अटक करण्यात आली, असे प्रसिद्धी पत्रकात धारावी पोलिसांनी म्हटले होते. या दोन भावांच्या अटकेनंतर नातलग आणि परिसरातील नागरिकांकडून मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
(हेही वाचाः अतिक्रमण निर्मूलन विभागालाच महापालिका बनवते कमजोर)
पुराव्याअभावी संशयितांना सोडले
त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. संशयित आरोपीविरुद्ध कुठलेही पुरावे हाती लागले नव्हते. तसेच वरिष्ठ अधिका-यांच्या चौकशीत संशयित आरोपींनी पोलिसांच्या दबावाखाली गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले. दरम्यान तपासात पीडित महिला ही ज्यावेळी घटना घडली त्या ४ ते ६ या वेळेत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होती अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे याबाबत चौकशी केली असता, पुराव्याअभावी दोन्ही संशयितांना सोडण्यात आले आहे. मात्र गुन्हा अद्याप रद्द करण्यात आलेला नसून, पीडितेचा मोबाईल फोन व तिचे सोशल मीडिया खाते तपासण्यात येत असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community