सिंधुदुर्गातील बीचवर नेमले जाणार टेहाळणी पथक

164

ज्या समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स सुरू आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांच्या सर्वोच्च सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व यंत्रणांनी सतर्क राहिले पाहिजे. कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणा आणि बंदर विभाग यांनी टेहळणी पथक स्थापन करून अनधिकृत बाबींवर तात्काळ कारवाई करावी, अशा सक्त सूचना सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

तारकर्लीमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ग्रामपंचायत, नगरपालिका हद्दीतील किनाऱ्यांवर जीवन रक्षक व्यक्तींची नेमणूक करावी. वाहन तळ व्यवस्था, माहिती फलक, दिशादर्शक फलक, धोक्याची सूचना देणारे सायरन, आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर भरती – ओहोटी यांच्या तारखा व वेळा यांची माहितीही फलकांवर लावण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! १ जुलै पासून पगारवाढ होणार? )

बंदर विभागाने बोटींची सुरक्षितता दर महिन्याला तपासावी. अनधिकृत व असुरक्षित बोटी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. एमटीडीसीने जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी त्यांचे संपर्क क्रमांक याबाबतची माहिती ठेवावी. स्कुबा ऑपरेटरांकडे परवाने, नोंदी आहेत का? याबाबतही तपासणी करावी. सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्याच्या नाव लौकिकाला कोणतेही भविष्यात गालबोट लागू नये याबाबत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहण्याबाबत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सूचना दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.