केरळात मान्सून दाखल होणार असल्याची भारतीय वेधशाळेची २७ मे रोजीची तारीख वरुणराजाने चुकवली. आता केरळात २९ मे रोजी नैऋत्य मोसमी वारे दाखल होतील, असा नवा अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला आहे. केरळात मान्सून दाखल व्हायला आता पोषक वातावरण तयार झाले असल्याची माहिती वेधशाळेने दिली.
(हेही वाचा – विनाकारण हॉर्न वाजवणं पडणार महागात; मुंबई पोलीस राबवणार ‘ही’ अनोखी मोहीम)
संभाव्य वेळेअगोदरच दोन आठवड्यांपूर्वी अंदमान निकोबार बेटात नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले होते. त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीला असानी वादळातील बाष्पाने मदत केली. मात्र रविवानंतर मान्सूनच्या प्रगतीला अडथळे निर्माण झाले. पाच दिवस नैऋत्य मोसमी वारे श्रीलंकेच्या वेशीवरच थांबून राहिले. गुरुवारी पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वा-यांनी श्रीलंका आणि नजीकच्या अरबी समुद्रात प्रवेश केला होता. श्रीलंकेचा अर्धा भाग काबीज करत त्यांनी मालदीवचाही बराचसा भाग व्यापला. शुक्रवारी अरबी समुद्रातील उत्तरेकडील भागांत मान्सूनची वाटचाल झाल्याची माहिती भारतीय वेधशाळेने दिली.
मात्र केरळात दाखल होण्यासाठी अजून दोन-तीन दिवसांचा अवधी असल्याचेही सांगण्यात आले. केरळात दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह पाऊस सुरु आहे. वातावरणातील लक्षणे पाहता २९ ते ३० मे दरम्यान केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community