एसी लोकलचा प्रवास स्वस्त झाल्यापासून या लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एकीकडे एसी लोकलकडून चांगली सुविधा दिली जात असताना, दुसरीकडे मात्र या लोकल ट्रेनला आता काही समाजकंटकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील या एसी लोकलवर दगडफेक होण्याच्या घटना वाढल्या असून, रेल्वे प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
दगडफेकीच्या इतक्या घटना
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पण मध्य रेल्वेवरील एसी लोकलवर दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 2 ते 3 महिन्यांत एसी लोकलवर दगडफेक करण्याच्या 23 घटना घडल्या आहेत. या मार्गावर सध्या एसी लोकलच्या 56 फे-या होत आहेत. हार्बर रेल्वेवर चेंबूर, गोवंडीसह अन्य मार्गांवर तसेच मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कळवा, मुंब्रा यांसह काही ठिकाणी रुळांजवळच असलेल्या झोपड्यांमधून धावत्या एसी लोकलवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे एसी लोकलच्या काचा फुटल्या असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)
कारवाई करणार
एसी लोकलची एक काच फुटली तर नवीन काच बसवण्यासाठी तब्बल दहा हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशाप्रकारे नुकसान करणा-यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः दुचाकीवर दोघांनाही हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर, सचिनच्या ट्वीटची होतेय चर्चा)
सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण पाच एसी लोकल असून, यातील चार लोकल प्रवाशांना सेवा देतात, तर एक लोकल राखीव म्हणून ठेवण्यात येते. येत्या काही महिन्यांत या मार्गावर एसी लोकलची संख्या वाढवण्याचा मध्य रेल्वे प्रशासन विचार करत आहे.
Join Our WhatsApp Community