वीर सावरकरांची साहित्यसंपदा

835

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारक होते, समाजसुधारक होते, राजकीय तत्त्ववेत्ते होते, नाटककार होते, निबंधकार होते, कथाकार होते, महाकवी होते, इतिहासकार होते, शाहीर होते. सावरकरांनी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केला. सावरकरांनी कमला, विरहोच्छ्वास, महासागर, गोमांतक या महाकाव्यांची निर्मिती अंदमानच्या कारागृहात लेखन साहित्य नसताना केली.‌ अत्यंत प्रतिकूल वातावरणात सावरकरांनी केलेली काव्यरचना माणसाला थक्क करणारी आहे.

सावरकरांच्या काव्यावर भाष्य करताना दाजी गणेश आपटे म्हणतात, ‘सावरकरांचे काव्य हे एखाद्या कारंज्याच्या रंगीत फवाऱ्याप्रमाणे पोकळ नाही. ते जिवंत आहे, ज्वलंत आहे, स्वसंवेद्य आहे आणि स्वानुभूत आहे. सावरकरांच्या काव्यातून प्रकट झालेले तत्वज्ञान हे भगवद्गीतेचे तत्त्वज्ञानच आहे असे स्पष्टपणे दिसून येते.’

सप्तर्षी काव्यात सावरकर लिहितात…

स्मरूनी नैष्काम्याचा करिता
उपदेश तै जगाला जो
स्पृहणाय दाविलासी उत्साह
अदम्याचा अगा लाजो

फळाची आशा करणे वेडेपणाचे लक्षण आहे. याला अनुसरून सावरकरांनी ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाईंची एक आख्यायिका पुनरुद्गारली आहे. ‘ज्याची फळाची इच्छा विरली नाही त्याचे डोके म्हणजे कच्चे मडके आहे. ते पूर्णपणे भाजून पक्के झाले नाही.’ असे उद्गार मुक्ताबाईंनी काढले होते त्याचा दाखला देऊन सावरकर सप्तर्षि काव्यात म्हणतात…

आशाची फलाशाची एक्या घावे
धृती कशी तडके
मुक्ता वदली त्याचे कच्चेचि तसे
मना तुझे मडके

मरणोन्मुख शय्येवर या काव्यात सुद्धा सावरकर ओळखीचे पत्र आम्हाजवळ त्या स्वये भगवान श्रीकृष्णाचे…
असे सहजपणे लिहून जातात. सावरकरांनी काव्याचे सर्व प्रकार लीलया हाताळले. सावरकरांनी आरत्या रचल्या, ओवीबद्ध काव्यरचना केली, भावगीते लिहिली, दीर्घकाव्य लिहिले, लावण्या लिहिल्या आणि पोवाडे रचले. निर्यमक वृत्तातही सावरकरांनी काव्यरचना केली आहे. हेच सावरकरांचे वैशिष्ट्य.

सावरकरांनी क्रांतिकार्याला पोषक ठरणारे लेखन केले आहे. त्याच बरोबर पराक्रमाची परंपरा सांगणारा तेजस्वी इतिहास सावरकरांनी आपल्या बांधवांसाठी लिहिला. सहा सोनेरी पाने, हिंदुपदपादशाही, १८५७ चे स्वातंत्र्य समर हे ग्रंथ त्याची साक्ष देतात.
त्याच बरोबर हिंदुत्व म्हणजे नेमके काय आहे ? याबाबत वैचारिक गोंधळ समाजामध्ये जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला होता. आजही तसाच वैचारिक गोंधळ जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहे. हा वैचारिक गोंधळ दूर करण्यासाठीच सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे पंचप्राण हे दोन ग्रंथ लिहिले.

क्रांतिकार्याला प्रेरणा देणारा जोसेफ मॅझिनी हा ग्रंथ सावरकरांनी लिहिला.‌ ब्रिटिश सरकारला या ग्रंथावर, ग्रंथाच्या लेखकावर, ग्रंथाच्या प्रकाशकावर कोणतीही कारवाई करता येणार नाही याची काळजी घेऊन अत्यंत सावधपणे लिहिलेला हा ग्रंथ आजही मार्गदर्शक ठरतो.‌ तरीही ब्रिटिश सरकारने या ग्रंथावर बंदी घातली होती.‌ या ग्रंथाची २००० प्रतींची पहिली आवृत्ती हा हा म्हणता संपली होती. या ग्रंथावर बंदी घालण्यात आली होती त्यामुळे दुसरी आवृत्ती काढता आली नाही.‌ पण १९४६ मध्ये या ग्रंथावरील बंदी उठवण्यात आली. सावरकरांच्या या ग्रंथाची दुसरी आवृत्ती त्यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आली.‌ सावरकरांनी जोसेफ मॅझिनी आणि रामदास स्वामी यांच्याविषयी म्हटले आहे की जोसेफ मॅझिनी हा इटलीचा रामदास आहे तर रामदास स्वामी म्हणजे हिंदुस्तानचा जोसेफ मॅझिनी आहे.

अस्पृश्यता हा समाजाला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी सावरकरांनी जात्युच्छेदक निबंध लिहिले. हे निबंध लिहीत असताना सावरकरांनी हिंदू संस्कृतीमधील मूलभूत संकल्पनांना धक्का न लावता हिंदू संस्कृतीत माणसाने घुसडलेल्या खुळचट कल्पनांना, रीतीरिवाजांना हद्दपार करण्यासाठी जिवाचे रान केले.‌ त्याचबरोबर समाजाला वैज्ञानिक दृष्टी देण्यासाठी विज्ञाननिष्ठ निबंध लिहिले. आपल्या साहित्य निर्मितीतून सावरकरांनी समाजाला नीरक्षीर विवेकाचा पाठ शिकवला.‌

सावरकरांची प्रत्येक साहित्यकृती ही आपले राष्ट्र, आपली संस्कृती, आपल्या परंपरा या भोवती फिरणारी आहे.‌सावरकरांचे आपल्या मातृभाषेवर विलक्षण प्रेम. आपल्या भाषेत जे परकीय शब्द घुसले आहेत त्यांची हकालपट्टी करून आपली भाषा शुद्ध करण्याचा त्यांनी घाट घातला. त्यांनी परकीय भाषेतील शब्दांना आपल्या भाषेतील पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले. त्यांची भाषाशुद्धीची चळवळ मराठी भाषेला समृद्ध, सुदृढ, आणि सबल करणारी होती.‌ इंग्रजांच्या राजधानीत सावरकरांनी अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, जोसेफ मॅझिनीचे चरित्र आणि राजकारण या दोन ग्रंथांचे लेखन केले तेही मातृभाषेतच केले.‌

विज्ञाननिष्ठ निबंधातून सावरकरांनी विज्ञाननिष्ठांचा अतिरेक करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.‌ त्याच बरोबर स्वतःच्या बुद्धीचा आणि सारासार विवेकाचा विचार न करता समाजाला घातक असणाऱ्या समजुती जोपासणाऱ्या लोकांवरही सावरकरांनी आपल्या लेखनातून कोरडे ओढले आहेत. सावरकरांनी निर्माण केलेली प्रत्येक साहित्यकृती ही राष्ट्रहिताचा, समाजहिताचा विचार करूनच केली आहे. सावरकरांनी विज्ञाननिष्ठ भूमिका बजावताना टोकाची भूमिका घेतली नाही. सावरकर प्रत्येक वेळी सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करतात हेच त्यांच्या संपूर्ण साहित्यातून आपल्या निदर्शनास येते.‌

देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सावरकरांना सहाय्य करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या विषयी रणशिंग नावाचे पुस्तक लिहून सावरकरांनी त्यांच्या कार्याची ओळख आपल्या देशबांधवांना करून दिली आहे.‌ परदेशात राहून भारत मातेच्या सुपुत्रांनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सावरकरांनी आपल्या ग्रंथ लेखनातून केले.‌

गांधींनी राजकारणात सक्रिय भाग घेतल्यानंतर त्यांनी आपल्या देशाची दिशाभूल केली.‌ राष्ट्रहिताचा विचार न करता तरुण पिढीचा तेजोभंग करण्याचे काम अवलंबिले. त्यावर टीका करण्यासाठी सावरकरांनी गांधी गोंधळ नावाचे पुस्तक लिहिले.‌ यात सावरकरांनी गांधीवर व्यक्तिगत टीका केली नाही तर गांधीजींच्या राजकीय धोरणांवर टीका केली आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.‌ राष्ट्रीय हिताला बाधक ठरणारे विचार राजकीय नेत्याने राजकीय व्यासपीठावरून व्यक्त करणे अत्यंत धोकादायक आहे. केवळ या कारणासाठीच सावरकरांनी गांधीजींच्या राजकीय विचारांवर कठोर प्रहार केला आहे. या पुस्तकाचा आरंभ

त्याचा येळकोट राहीना ।
मूळ स्वभाव जाईना ।

या तुकाराम महाराजांच्या अभंगातील दोन ओळींनी केला आहे. यावरून सावरकरांना गांधीजींचा राजकीय, वैचारिक गोंधळ कसा झाला आहे तेच स्पष्ट करायचे आहे हे आरंभीच सावरकरांनी मोकळेपणाने सांगितले आहे. सावरकरांना आपल्या मातृभूमीविषयी, संस्कृतीविषयी, परंपरेविषयी विलक्षण प्रेम आहे, पराकोटीचा अभिमान आहे. तो त्यांच्या लेखनातून विशेषत्वाने प्रकट होतो. ‘मना तुला आज सुखाचा अधिकार नाही’ या लेखात तो आपल्या प्रत्ययाला येतो. पुराण पवित्र हिंदुभूमीविना हे भाग्य परमेश्वराने दुसऱ्या कोणत्या देशाच्या ललाटी लिहिले आहे? प्रत्यक्ष देवांनाही स्वर्गाचा कंटाळा आला म्हणजे जी धारापालट करण्याला हवीशी वाटावी त्या माझ्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या हिंदुभूमी वाचून दुसऱ्या कोणत्या भूमीच्या वाट्याला असा घनगर्जित पर्जन्य काळ असा नितांत रम्य शरत्काल आणि तो तसा रंगेल वसंत ऋतु योग्य प्रमाणात आला आहे? तर मग मना या महत्भाग्यात अभिमानाने आकाशाहून मोठे होऊन या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सिद्ध हो! … पुराणकाळात असुरांवर मिळवलेल्या प्रचंड विजयाचे स्मारक म्हणून नवरात्र आपण पाळत असतो. तेव्हा उठ, भगवती अंबिकेच्या जयजयकाराने दशदिशा दणाणून सोड! जगदंबेने ज्यावेळी आसुरी वृत्तीचे निर्दालन केले हे खरे परंतु आज यावेळी एकदा निर्धारित झालेली ती आसुरी वृत्ती पुन्हा सर्व सज्जनांना पददलित करून पुण्यभूमीला दुःखात लोटत आहे. त्या पुराणकाळी जगदंबेने असुरांचा नि:पात करून उभारलेला तो स्वातंत्र्याचा ध्वज आज कुठे उभा आहे? मग मना, तू कसल्या सुखाच्या आशा धरतोस? यावेळी नऊ दिवस, नऊ रात्री या पुन्हा भूमीला संत्रस्त करणाऱ्या असुरांशी निकराचे युद्ध केले तेव्हा दहाव्या दिवशी विजयादशमी प्राप्त झाली! हे मना! तू आज हतबल झालेल्या मातृभूमीला उजविण्याकरता तुझी नवरात्र कुठे पुजली आहेस तर आज सुखाचा तू अधिकारी होणार?

अशा प्रकारे सावरकर आपल्या बांधवांना राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्यासाठी आपल्या साहित्यातून प्रेरणा देतात. सावरकरांचे समग्र साहित्य सर्वसामान्य माणसाच्या अंत:करणात राष्ट्रभक्तीची, शौर्याच्या परंपरेची, पौरुषत्वाची, राष्ट्रनिष्ठेची, संस्कृतीच्या यथार्थ अभिमानाची ज्योत पेटवणारे आहे.

म्हणूनच साहित्यसम्राट आचार्य अत्रे सावरकरांच्या साहित्य निर्मिती विषयी सावरकरांच्या मृत्यू लेखात लिहितात…‘मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले. हरी नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्याराव सावरकरांएवढा प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेला नाही… सावरकर भारतीय इतिहासातील एक चमत्कार होते. सावरकरांनी आपल्या कार्यातून आणि लेखनातून देशाच्या स्वातंत्र्यप्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार फुलवला. सावरकरांचे संपूर्ण साहित्य देशभक्तीने आणि स्वातंत्र्य प्रेमाने ओथंबलेले आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि ओळीतून देशभक्तीचा ज्वालाग्राही रस उकळतो आहे, स्वातंत्र्य प्रेमाचा वन्ही भडकतो आहे. अशा शब्दात आचार्य अत्र्यांनी सावरकरांच्या साहित्याचा गौरव केला आहे. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची साहित्य संपदा अखिल हिंदू समाजाला अनंत काळ प्रेरणा देणारी आणि मार्गदर्शन करणारी आहे. या अजरामर साहित्यसंपदेकडे आपण पाठ फिरवली तर आपल्या सारखा कर्मदरिद्री जगात कोणी असणार नाही. म्हणूनच ज्यांना आपल्या राष्ट्रासाठी काही योगदान द्यायचे असेल अशा देशभक्तांनी, संस्कृतीनिष्ठांनी सावरकरांच्या समग्र साहित्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्याला दुसरा पर्याय नाही.
(लेखक वीर सावरकर अभ्यासक आणि व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.