इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना दिव्यांगाला अपमानजनक वागणूक देणे चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या 7 मे रोजी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी एका दिंव्यांग मुलाला रांची-हैदराबाद फ्लाईटमध्ये चढण्यापासून रोखले होते.
…म्हणून ठोठावला 5 लाख रुपयांचा दंड
इंडिगोच्या रांची-हैदराबाद फ्लाईटमध्ये प्रवास करणाऱ्या मनीष गुप्ता यांच्या दिव्यांग मुलाला इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी फ्लाईटमध्ये चढण्यापासून मज्जाव केला होता. याप्रकरणाची वृत्त प्रकाशित झाल्यानंतर इंडिगो कंपनीवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर डीजीसीएने या प्रकरणाची दखल घेत इंडिगो कंपनीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
(हेही वाचा – ‘या’ शहरात आता पर्यटकांना मिळणार ‘हेलिकॉप्टर टॅक्सी’ची सर्व्हिस!)
DGCA काय म्हटले…
याप्रकरणाच्या चौकशीनंतर डीजीसीएने सांगितले की, भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करणार आहे. तसेच, हे प्रकरण सहानुभूतीने हाताळले गेले असते, तर हे प्रकरण इतके वाढले नसते. परंतु, एअरलाइनचे कर्मचारी परिस्थिती हाताळू शकले नाहीत आणि नागरी उड्डाण नियमांची भावना कायम ठेवण्यास चुकले. याप्रकरणी इंडिगो एअरलाइनचे सीईओ रॉनजॉय दत्ता म्हणाले की, बोर्डिंगच्या वेळी मुलगा घाबरला होता आणि त्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करावी लागली. तसेच, विमान कंपनीने सांगितले होते की, कुटुंबाला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पाठवण्यात आले.