राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दर दिवसाला पुन्हा वाढत असताना परिचारिका बेमुदत संपावर ठाम आहेत. चंद्रपूर, गोंदिया, नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यात रिक्त पदांवर परिचारिकांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. प्रशासकीय बदली स्वरुपांत या जिल्ह्यांना टाळणा-या परिचारिकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त्यांवर विरोध कशाला, असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाच्या अधिका-यांनी उपस्थित केला आहे.
या दोन मागण्या
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने राज्यातील सरकारी रुग्णालयांत बेमुदत आंदोलन सुरू आहे. प्रशासकीय बदल्या टाळा, कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची नियुक्ती नको या दोन प्रमुख मागण्या संघटनेच्यावतीने केल्या जात आहेत. आम्हाला सरकार दरबारी चर्चेसाठी बोलावणे आलेले नाही, अशी भूमिका मांडणा-या संघटनेच्या सदस्यांसह गेल्या आठवड्याभरात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाच्या अधिका-यांनी चार वेळा बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन, तसेच राज्यातील सरकारी रुग्णालयांत आयांचे काम करणा-या संघटनेनेही सहभाग नोंदवला होता.
(हेही वाचाः बेमुदत संपाला सगळ्याच परिचारिकांची साथ नाही)
संघटना ठाम
अखेरच्या दोन बैठकीत महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन सहभागी झाली नाही. शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाने आंदोलन पुकारलेल्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेला बैठकीसाठी बोलावले होते. प्रशासकीय बदल्या होणार नाहीत, असे आश्वासन अधिका-यांनी परिचारिका संघटनेला दिले. आश्वासन लेखी स्वरुपात मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना ठाम आहे.
संघटनेकडे उत्तर नाही
परिचारिकांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त पदांचे काय करायचे, या वैद्यकीय अधिका-यांच्या प्रश्नावर संघटनेकडे उत्तर नाही. आम्ही कोरोना काळात चंद्रपूरात कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करुन रुग्णसेवा पार पाडली. सेवा काळ सुरू असलेल्या परिचारिका चंद्रपूर, गोंदिया, नंदुरबार, सातारा या जिल्ह्यांत बदली घेणे टाळतात. मग कंत्राटी पद्धतीने नियुक्तीला विरोध नको, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातील अधिका-यांनी मांडली. याबाबत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघनेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी उत्तर दिले नाही.
(हेही वाचाः परिचारिकांच्या आंदोलनामुळे १०० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या)
Join Our WhatsApp Community