राज्यसभेच्या सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अपक्षांच्या हाती

130

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने तिस-या उमेदवाराची घोषणा केल्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण आता 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे एका उमेदवाराचा पत्ता कट होणार हे निश्चित आहे. पण यापैकी कोणत्या उमेदवाराला घरी बसावं लागणार हे आता सर्वस्वी अपक्ष आमदारांच्या हातात असल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातून आलेले इम्रान प्रतापगडी तर भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता राज्यसभा निवडणुकीसाठी लागणा-या मतांच्या गणितानुसार, भाजपचे दोन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकेक उमेदवारांना पहिल्या फटक्यातील 42 मतं मिळून राज्यसभेत सहज एंट्री मिळेल.

(हेही वाचाः फडणवीसांनी आघाडीला फॉर्म्यूला सांगितला; म्हणाले, “आम्हाला घोडे बाजार करायचा…”)

असा आहे घोडेबाजार

खरी लढत होणार आहे ती सहाव्या जागेसाठी. राज्यसभेची निवडणूक ही इतर निवडणुकांप्रमाणे गुप्तपणे होत नाही. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपण कोणाला निवडून देत आहोत हे पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवावे लागते. किंबहुना ज्या उमेदवाराला पक्षाच्या प्रतिनिधीने मत देण्यासाठी व्हिप जारी केले आहे त्याच उमेदवाराला प्रत्येक आमदाराला मतदान करावे लागते. तसे केले नाही तर त्या आमदाराला आपली आमदारकी गमवावी लागते.

आता मविआतील तीन पक्षांची मिळून 27 मतं शिल्लक राहतात, तर भाजपची 29 मतं शिल्लक राहतात. पण यामध्ये सगळ्यात मोठे गेम चेंजर ठरू शकतात ते अपक्ष आमदार. कारण अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांची 16 मतं आहेत. अपक्ष आमदार हे कुठल्याच पक्षाचे नसल्याने उमेदवाराला मत देताना त्यांच्यावर कुठलंही बंधन नसतं. त्यामुळे आता सहावी जागा कोणाला द्यायची हे थोडक्यात अपक्ष आमदारांच्या हातात असणार आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्र भाजपचे मिशन 48, मविआला धोबीपछाड देण्याची व्यूहरचना)

कोणाची नाचक्की होणार?

ज्याअर्थी भाजपने या निवडणुकीसाठी तिस-या उमेदवाराला रिंगणात उतरवले, त्याअर्थी भाजपने या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी केली असणार, यात कुठलीही शंका नाही. उमेदवार उभा करुन तो निवडून आला नाही तर पक्षाची मोठी नाचक्की होते. त्यामुळे या नाचक्कीला कोणत्या पक्षाला सामोरे जावं लागणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

हे पक्षही ठरवणार भवितव्य

अपक्षांसोबतच इतर पक्ष ज्यामध्ये बहुजन विकास आघाडी, भारिप बगुजन महासंघ, समाजवादी पक्ष, शेकाप, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष, मनसे या संख्याबळ कमी असणा-या पक्षांचं मतंही सहाव्या जागेसाठी महत्वाचं ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचाः पुतीन यांचा मृत्यू! ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्याने खळबळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.