केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्र्याला ईडीकडून अटक

162

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारसाठी धक्का देणारी घटना समोर येत आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील सरकारसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

सत्येंद्र जैन यांची याआधीच ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. 5 एप्रिल रोजी ईडीने जैन यांची 4.81 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर आता सोमवारी त्यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचाः रुपाली चाकणकर यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी)

आपचा भाजपवर निशाणा

ईडीच्या या कावाईनंतर दिल्ली सरकारमधील नेत्यांकडून केंद्रातील भाजप सरकावर टीका करण्यात येत आहे. जैन यांच्या विरोधात गेल्या आठ वर्षांपासून खोटी केस चालवण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. पण त्यात काही ठोस पुरावे हाती न लागल्याने त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावणे बंद केले. पण आता पुन्हा एकदा त्यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या आहेत. जैन हे हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत आपचे प्रभारी असल्यामुळे त्यांना या प्रकरणात नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांकडून बेकायदेशीर पैसा मिळवल्याचा आरोप सत्येंद्र जैन यांच्यावर आहे. तसेच त्यांच्यावर 11.78 कोटींच्या हवाल्याचाही आरोप आहे. 2010-12 मध्ये कंपन्यांद्वारे मनी लाँड्रिंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. आयकर विभागाकडून बेनामी संपत्ती कायद्याच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे. त्याची देखील चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे.

(हेही वाचाः नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होणार! CRZ प्रकरणी नोटीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.