तीर्थक्षेत्र रामेश्वरमला समुद्रमार्गे देशाशी जोडणारा भारतातील जगप्रसिद्ध पांबन पूल आता 114 वर्षांचा झाला आहे. मधूनच दोन भागात उघडणारा हा भव्य आणि देखणा पूल आता रेल्वेने रिटायर करण्याचा निर्णय घेतला असून, जहाजांना जाण्यासाठी मार्ग दिला आहे. मात्र, त्याआधीच पांबन पुलाला लागूनच नवीन पांबन पूल तयार होण्याच्या तयारीत आहे. हा पूल देशातील असा पहिला पूल असणार आहे, जो मध्यभागावरुन वर जाईल आणि जहाजे त्याखालून जाऊ शकतील.
1964 च्या चक्रीवादळात सध्याचा जुना पांबन पूल खराब झाला होता. त्याचा काही भाग समुद्रात वाहून गेला होता, नंतर मेट्रो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ई श्रीधरन यांनी पुन्हा दुरुस्ती करून तो मजबूत केला होता. आजही या जुन्या पांबन पुलावरून गाड्या रामेश्वरमला जातात. मात्र समुद्राचे खारे पाण्यामुळे तो गंजू लागला आहे. या पुलावरून ताशी १० किलोमीटर वेगाने गाड्या धावू शकतात. तर नव्याने बांधलेल्या पुलावरून गाड्या ताशी ८० किलोमीटर वेगाने धावू शकतील.
नवीन पांबन पुलाची वैशिष्ट्ये
- हा देशातील पहिला वर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे.
- यामध्ये मध्यभागी असलेला 72.5 मीटरचा स्पॅन दोन्ही बाजूंच्या लिफ्टच्या माध्यमातून वरच्या बाजूस नेण्यात येईल जेणेकरून जहाजे त्याखालून जाऊ शकतील.
- हा पूल 2.05 किमी लांबीचा असेल.
- हा पूल मंडपम रेल्वे स्थानक आणि रामेश्वरम रेल्वे स्थानकादरम्यान समुद्रावर बांधला जात आहे.
- 560 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल यावर्षी डिसेंबरमध्ये तयार होणार आहे.
( हेही वाचा: ‘अल- कायदा’ची काश्मीरवर वक्रदृष्टी; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार )
नवीन आणि जुन्या पांबन ब्रिजमधील फरक
- जुना पूल सिंगल लाइनचा आहे, तर नवीन पांबन पूल दुहेरी रेल्वेमार्ग आहे.
- जुन्या पुलाला 147 खांब आहेत, तर नवीन पूल 101 खांबांवर बांधला आहे. नवीन पुलातील पिलरची खोली 35 मीटर आहे.
- जुन्या पुलाचा स्पेशल स्पॅन 68 मीटर तर नवीन पुलाचा स्पेशल स्पॅन 72.5 मीटर असेल.
- जुन्या पुलावर सर्वसाधारण स्पॅन 12 मीटर म्हणजेच दोन खांबांचे अंतर 12 मीटर आहे, तर नवीन पुलामध्ये हे अंतर 18 मीटर ठेवण्यात आले आहे.