दोन दिवसांपूर्वी केरळात मान्सून दाखल झाल्याची भारतीय वेधशाळेने घोषणा केल्यानंतर खासगी अभ्यासकांनी भारतीय वेधशाळेच्या केरळात मान्सून दाखल करण्याच्या निकषांवर संशय व्यक्त केला होता. यावर अखेर भारतीय वेधशाळेचे महासंचालक डॉ मृत्यूंजय मोहापात्रा यांनी लोकांनी खासगी हवामान अभ्यासकांवर नव्हे तर आमच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले.
( हेही वाचा : सकारात्मक चर्चा; परिचारिका संप घेणार मागे)
हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी मान्सून केरळात दाखल झाल्याच्या भारतीय वेधशाळेच्या घोषणेबाबत आक्षेप नोंदवला होता. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप येथे सलग दोन दिवस २.५ मिमी पाऊस झाल्यास मान्सून केरळात दाखल झाल्याचा निकष पूर्ण होतो. २९ मे रोजी केवळ ५ स्थानकांवर २.५ मिमी पावसाची नोंद झाली, असा मुद्दा देवरस यांनी मांडला होता. १४ स्थानकांपैकी ५ स्थानकांत २.५ मिमी तर उर्वरित स्थानकांवर केवळ १ मिमी पावसाची नोंद झाली. २८-२९ मे रोजी अपेक्षित ठिकाणी मान्सून दाखल झाल्याचे निकष पूर्ण झालेले नसताना केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करणे योग्य नसल्याचे देवरस म्हणाले होते.
आम्ही वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. भारतीय वेधशाळेला पावसाच्या अंदाजाबाबत, केरळमधील मान्सूनच्या प्रवेशाबाबत माहिती देण्याचे अधिकार आहेत. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, असे सांगत सर्व निकषांची आम्ही पडताळणी केली असल्याचे डॉ मोहापात्रा म्हणाले.
भारतीय वेधशाळेने केरळातील मान्सून दाखल करताना पाळलेले निकष –
- पश्चिमेकडून वाहणा-या वा-यांची व्याप्ती सरासरी समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटरपर्यंत असते.
- आग्नेय अरबी समुद्रात पश्चिमेकडून वाहणा-या वा-यांचा वेग ताशी २५ ते ३५ किलोमीटर आहे.
- केरळ आणि नजीकच्या पूर्व भागांतील अरबी समुद्रात ढगाळ वातावरण आहे.
- दक्षिणेतील १४ स्थानकांपैकी १० स्थानकांवर २.५ मिमी पाऊस झाला आहे.