मुंबईत कोरोनाच्या भयावह परिस्थितीत प्रत्येकाच्या दारात जाऊन रुग्णांना गोळ्या पुरवणा-या तब्बल ४ हजार आरोग्यसेविकांनी एल्गार पुकारला आहे. आझाद मैदानात १ जूनपासून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत आंदोलन करण्यावर आरोग्यसेविका ठाम आहेत. पालिका अधिका-यांकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नसल्याने या वेळकाढू धोरणाविरोधात आम्ही लढत असल्याची माहिती महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी दिली.
केवळ ८ हजार १०० रुपये महिना पगारावर आरोग्यसेविकांनी कित्येक वर्ष कामे केली आहेत. न्यायालयीन आदेशानुसार किमान वेतनाच्या तरतुदीत १६ हजारांचा पगार परिचारिकांना अपेक्षित आहे. ८ हजार १०० रुपये पगारातही कर स्वरुपात ९०० रपये कापले जातात. आरोग्यसेविकांच्या तुटपुंज्या पगारात त्यांना कर देणे बंधनकारक करण्यामागील कारणही दिले जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया अॅड. देवदास यांनी दिली. गर्भावस्थेत कामाचे ताण सहन न झाल्याने प्रसूतीनंतर तीन दिवसांत एका आरोग्यसेविकाचा मृत्यू झाला. ही आरोग्यसेविका प्रसूतीच्या दिवशीही कामावर होती.
राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत काम करताना आरोग्यसेविकांना दिला जाणारा पगार अद्याप पूर्णपणे दिलेला नाही. या कामासाठी आरोग्यसेविका दर दिवसाला किमान ६० घरे फिरत होत्या. कोरोनाकाळात जोखीमेचे काम करुनही आरोग्यसेविका कोरोना योद्धाच्या सन्मानापासून वंचित राहिल्या. सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत येणा-या कामासाठी आरोग्यसेविकांनी स्वखर्चाने कामे केली. या कामाचा पगारही प्रलंबित असल्याची खंत अॅड. प्रकाश देवदास यांनी व्यक्त केली.
आरोग्यसेविकांच्या मागण्या
- २०१५ सालापासून किमान वेतन थकबाकीसह द्यावे.
- २०११ पासून भविष्य निर्वाह निधी व पेन्शनचा फायदा द्यावा.
- निवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना उपदनाची रक्कम द्यावी.
- २००० सालापासून दरमहा सहाशे रुपये वाहतूक भत्ता द्यावा.
- प्रसूती रजा द्यावी.