बंद पडलेली वनराणी होणार पर्यावरणप्रेमी!

142

लॉकडाऊन काळापासून बंद पडलेल्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणीला पुन्हा नव्याने उभारण्याचा निर्णय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने घेतला आहे. दीड वर्षांहून अधिक काळ वनराणी बंद असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उद्यान प्रशासन आता डिझेलऐवजी पर्यावऱणप्रेमी वनराणीची निर्मिती कऱणार आहे. या कामाच्या खर्चासाठी उद्यानाला वनराणी भेट देणा-या टाटा समूहाकडेच हा प्रस्ताव दिला जाईल, अशी माहिती वनसंरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जून यांनी दिली. वनराणीच्या मेकओव्हरसाठी अंदाजित खर्च मात्र उद्यान प्रशासनाकडून दिले गेले नाही.

राष्ट्रीय उद्यानात पावसामुळे पहिल्यांदा वनराणीचे रुळ खराब झाल्याचे आढळून आले होते. दुरुस्तीनंतर वनराणी काही महिन्यांनी सुरु झाली होती. पूराच्या पाण्यात लागोपाठ दोनदा रुळावर बिघाड झाला. निसर्ग आणि तोक्ते वादळात अनेकदा झाडे उन्मळून पडल्याने तसेच पूराच्या पाण्यात वनरामीचे रुळ आणि स्लिपर्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वनराणी ४८ वर्ष जुनी असल्याने डब्ब्यांची सातत्याने होणारी दूरावस्था पाहता वनराणीची सेवा बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला.

(हेही वाचा – लेजेंडरी Deccan Queen ला 92 तर Punjab Mail एक्स्प्रेसला 110 वर्षे पूर्ण!)

दरम्यान, उद्यानात खासगी वाहने बंद करण्यात आली. बंद वनराणी आणि विस्तीर्ण पर्यटन क्षेत्रात पायी चालणे अवघड असल्याने पर्यटकांनी उद्यानात पाठ फिरवली आहे. वनराणीच्या मार्गावर तसेच डब्ब्यांत अनेक हिंदी व प्रादेशिक चित्रपटांचे चित्रीकरणही केले जाते. यातूनही उद्यानाला चांगला महसूल मिळतो. वनराणीला २०२४ साली ५० वर्ष पूर्ण होतील, या सुवर्ण महोत्सवी वर्षात वनराणी नव्या रुपात पर्यटकांसाठी उपलब्ध करण्याचा मानस उद्यान प्रशासनाचा आहे. त्यामुळे कात टाकलेल्या वनराणीला पाहायला पर्यंटकांना दोन वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल.

वनराणीचा इतिहास 

१९७४ साली पर्यटकांकरिता वनराणी सुरु करण्यात आली. वनराणीचे इंजिन आणि डब्बे जमशेदरपूर येथील टेल्को यांच्यामार्फत उद्यानात सीएसआर फंडातून दिले गेले. त्यानंतर पर्यंटकांच्या सेवेसाठी वनराणी उद्यानात दाखल झाली.

वनराणीची सफारी

वनराणी उद्यान परिसरातील कृष्णगिरी उपवनातील २.३ किलोमीटर अंतराची पर्यटकांना सफारी देते. वनराणीचे इंजिन १०० एच.पी.चे असून प्रत्येकी १६ पर्यंटकांची क्षमता असलेले ४ डब्बे वनराणीला जोडलेले आहेत. वनराणीच्या ट्रेन सफारीत कृष्णगिरी आणि त्रिमूर्ती अशी दोन स्थानके आहेत. दोन बोगद्यांमधून जाताना उद्यानातील बंदिस्त प्राण्यांनाही पाहता येते.

काय बदलले जाणार

वनराणीचे लोखंडी रुळ नव्याने टाकणे, सध्याचे लाकडी स्लिपर्स बदलून त्याऐवजी सिमेंटने बनवलेले स्लिपर्स तयार करणे, वजनाने हलक्या पण आकर्षक डब्ब्यांची बांधणी करणे, वनराणीतील दोन्ही स्थानकांची पूनर्बांधणी, डिझेल इंजिन बदलून विद्युत इंजिन बसवणे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.