रिटायर्ड एसीपीच्या घरात घरफोडी, भरलेल्या रिव्हॉल्वरसह ८ लाखाचे दागिने गेले चोरीला

133

मुंबईतील एका रिटायर्ड एसीपीच्या घरात घरफोडी झाली आहे. चोरट्यानी एसीपींचे भरलेले रिव्हॉल्वर आणि दागिने, रोख रकमेसह पोबारा केला आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

( हेही वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात २ लाख ७५ हजार जागांसाठी मेगाभरती )

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध 

दिगंबर काळे (६६) असे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) यांचे नाव आहे. कुर्ला पूर्व कामगार नगर येथील बंगला क्रमांक २० या ठिकाणी कुटुंबासह राहतात. काळे हे २३ एप्रिल रोजी कुटुंबासह गावी गेले होते, मंगळवारी ते गावाहून परत आले असता त्यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक घराच्या बाजूची ग्रील तोडलेली व खिडकी उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घरातील कपाटे तपासली असता रोख रक्कम ४० हजार, सोने-चांदीचे दागिने आणि त्यांची परवाना असलेली .३२बोअरची रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

काळे यांनी तात्काळ नेहरूनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. काळे यांच्या घरातून सुमारे ८ लाख रुपयांचा ऐवज आणि महत्वाचे म्हणजे काडतुसानी भरलेले रिव्हॉल्वर चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. नेहरुनगर पोलिसांची तीन पथके या चोराच्या शोधासाठी तैनात करण्यात आलेली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.