महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. 6 जागांसाठी 7 उमेदवार शर्यतीत असल्याने आधीच ही निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे स्पष्ट असल्यामुळे महाविकास आघाडीला प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेस तुरुंगात असलेल्या नवाब मलिक आणि अमित देशमुख यांच्या मतांसाठी न्यायालयात जाणार आहे.
मविआच्या अडचणी वाढण्याची शक्यता
राज्यसभा निवडणुकीत अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनाही मतदान करता यावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आता न्यायालयात धाव घेतली आहे. देशमुख आणि मलिक तुरुंगात असल्यामुळे महाविकास आघाडीची अडचण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघांनाही मतदानाची संधी न मिळाल्यास मविआची दोन मतं कमी होणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.
संख्याबळाची आवश्यकता
सध्या राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आहेत. पण देशमुख आणि मलिक हे तुरुंगात असल्यामुळे ही संख्या 51 झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 168 मतांसाठी दोन मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता मलिक आणि देशमुखांना मतदान करायची संधी मिळणार का आणि त्याचा मविआला किती फायदा होणार, हे पाहणे आता महत्वाचे आहे.
Join Our WhatsApp Community