तुम्ही कधीतरी किंवा रोज ऑफिसला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असाल. यावेळी तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांसमोरील लांब-लचक रांग पाहून तुम्ही देखील वैतागले असणारच. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. मुंबई आणि उपनगरीय मार्गावर तिकीट खिडक्यांवरील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी १९९२ रोजी सीव्हीएम कूपन यंत्रणा सुरू झाली. प्रवाशांचा हा वेळ वाचवण्यासाठी वापरात आणलेल्या ‘कूपन व्हॅलिडेटिंग मशिन’ (सीव्हीएम) यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. या ‘कूपन व्हॅलिडेटिंग मशिन’ आणि त्यात वापरले जाणारे रंगबेरंगी कूपन्स सोबत तुमच्याही काही आठवणी असतील, यात शंका नाही. मात्र रेल्वे स्थानकातील झटपट तिकीट पंच करणारा लाल डब्बा (सीव्हीएम) आता इतिहास जमा झाला आहे.
गेली 25 ते 30 वर्षे उपनगरीय लोकल मार्गाचा अविभाज्य बनलेल्या सीव्हीएम कूपन यंत्रणा 2015 सालापासून संपुष्टात आली. रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरील गर्दीच्या समस्या सोडवण्यासाठी 1992 रोजी सीव्हीएम कूपन यंत्रणा सुरू झाली होती. प्रवाशांच्या सोयीची ठरणारी ही सेवा काळाच्या ओघात मात्र रेल्वे प्रशासनासाठी अधिकच त्रासदायक ठरली. फसव्या, लबाड प्रवाशांचे बनाव, आंदोलनाचा फटका आणि महसूलचा ताळ-मेळ न बसल्याने अखेर ही सेवा बंद करून ही सीव्हीएम कूपन यंत्रणा इतिहास जमा करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. परिणामी प्रवाशांचा तिकीट खिडक्यांवरील वेळ वाचावा यासाठी वापरात आणलेल्या ‘कूपन व्हॅलिडेटिंग मशिन’ म्हणजेच सीव्हीएम यंत्रणा कालबाह्य करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, 1992 रोजी सुरू झालेली ही यंत्रणेची संकल्पना रेल्वेचे अधिकारी संधू यांना राबविली. या यंत्रणेची किंमत साधारण 45 हजार रूपयांपर्यंत आहे. या यंत्रणेत वापरली जाणारी तिकीट कूपन्स पुस्तिकेत 1,2,5 रूपये किंमतीच्या तिकीटांचा समावेश होता. या मशिनमध्ये तिकिटांच्या रक्कमेप्रमाणे एकेक कूपन टाकून त्यावर प्रवाशाची तारीख, वेळ, कालावधी छापला जाण्याची व्यवस्था होती आणि ही व्यवस्थाच त्याचे वैशिष्ट्य ठरले. पण काळाच्या ओघात ही मशीन नादुरुस्त होण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपयुक्त आणि अधिक सोयिस्कर ठरू लागले. त्यामुळे ही यंत्रणा डिजिटलायझेशनच्या युगात मागे पडल्याचे समोर आले आणि ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम)चा वापर प्रवाशांकडून केला जाऊ लागला.
तिकीट पंच करणारा ‘लाल डब्बा’ इतिहासजमा होण्याची ही आहेत कारणे…
-
तिकीटांचा हिशोब ठेवणं कठीण
‘कूपन व्हॅलिडेटिंग मशिन’ (सीव्हीएम) यंत्रणेमध्ये तिकिटांचा हिशोब ठेवणे कठीण झाले. तिकीटांसाठी बारकोडसारखी प्रणाली नसल्याने नेमका हिशोब ठेवण्यात असंख्य अडचणी येत होत्या.
-
प्रवाशांच्या लबाडीने रेल्वे हैराण
‘कूपन व्हॅलिडेटिंग मशिन’मध्ये वापरण्यात येणाऱ्या कूपनच्याच कागदाप्रमाणे जाड कागदाच्या रंगीत झेरॉक्स काढून त्याचा वापर तिकिटांसाठी करण्याच्या असंख्य तक्रारी समोर येऊ लागल्या या प्रकाराला रेल्वे प्रशासन देखील हैराण झाले.
-
आंदोलनाच्या फटक्यात सीव्हीएमला लक्ष्य
रेल्वे विरोधातील किंवा रेल्वेच्या कोणत्याही आंदोलनात स्थानकांवर असणाऱ्या सीव्हीएम यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले. यावेळी या यंत्रणेची नासधूस करून तोडफोड करण्याचे प्रमाणही वाढत गेले.
-
सीव्हीएम यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्न निर्माण
सातत्याने वापर होत असलेल्या या यंत्रणेच्या कित्येक मशीन नादुरूस्त झाल्याचे बघायला मिळाले. त्यापैकी अनेक तर दुरूस्तीच्या बाहेर असल्याने त्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होत गेला. तर वार्षिक देखभाल करणाऱ्या कंपन्यांनी नव्याने करार करण्यात कोणतेही स्वारस्य दाखवले नाही. त्यातून दुरुस्तीचे असंख्य प्रश्न निर्माण झाले.
Join Our WhatsApp Community