गेले अनेक दिवस औरंगाबादमधील पाणीप्रश्न गंभीर होत चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे औरंबाबाद शहराचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा, यासाठी रहिवाशांकडून जोरदार मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिका-यांना चांगलेच खडसावले असून, मला कारणे देत बसू नका, या प्रश्नावर तातडीने मार्ग काढा, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे अधिका-यांच्या तोंडचेच पाणी पळाले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्याआधीच औरंगाबादमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादमधील पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवून तिथल्या नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला पाहिजे. नव्या योजना अंमलात आणण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या आहे त्या पाणीसाठ्यातून नागरिकांना कशाप्रकारे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना केल्या आहेत.
(हेही वाचाः ‘शस्त्रक्रिया करायला गेले आणि…’ मास्कवरुन अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला)
कंत्राटदारावर कारवाईचे आदेश
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1 हजार 680 कोटी रुपयांची योजना वेगाने पूर्ण करण्यात यावी यासाठी या योजनेचा आढावा घेण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. या योजनेला तातडीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कुठलीही कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच या योजनेच्या कंत्राटदाराकडून संथ गतीने काम सुरू असल्याचा तक्रारी येत आहेत. त्यामुळे या कंत्राटदारावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना दिले आहेत.
Join Our WhatsApp Community