100 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख दोषी असल्याचं म्हटलं जात आहे. सीबीआयने देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांच्याविरोधात एकूण 49 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.
आरोपपत्र दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप पोलिस अधिकारी सचिन वाझेने केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला असून, वसुली रॅकेट चालवल्याचा गंभीर आरोप या आरोपपत्राद्वारे करणअयात आला आहे. या प्रकरणात सचिन वाझेसह इतरही आरोपींची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
(हेही वाचाः हा विषय कायमचा संपवायचा आहे! राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश)
वाझे माफीचा साक्षीदार
सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज आता विशेष सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे वाझे या प्रकरणात आता माफीचा साक्षीदार झाला आहे. मंगळवारी सचिन वाझेला सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आले होते. त्यामध्ये सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले आहे. 7 जून रोजी होणा-या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष न्यायालयापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
Join Our WhatsApp Community