मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यांची पावसाळापूर्व सफाई ही पूर्ण झाली आहे. आतापर्यंत सुमारे सरासरी १०५ टक्के सफाई झाली आहे. तर मिठी नदीची ९८ टक्के सफाई आतापर्यंत झाली असून, उर्वरित २ टक्के सफाई पुढील २ ते ३ दिवसात पूर्ण होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. शहरात १०५ टक्के, पूर्व उपनगरांत १०६ टक्के आणि पश्चिम उपनगरांमध्ये १०४ टक्के एवढी सफाई झाली असल्याचा दावा केला आहे, तर छोट्या नाल्यांची सफाई १०९ टक्के पूर्ण झाल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कार्यरत असणा-या विविध संस्थांची आणि महानगरपालिकेच्या संबंधित विभागांची एक विशेष समन्वय बैठक आज आयोजित करण्यात आली होती. महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका आयुक्तांच्या सभागृहात आयोजित या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प). पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार आणि बेस्ट उपक्रमाचे महा-व्यवस्थापक लोकेश चंद्र हे उपस्थित होते. या बैठकी दरम्यान पावसाळ्या दरम्यान उद्भवू शकणा-या विविध परिस्थितींबाबत सविस्तर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांद्वारे पावसाळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व करण्यात येणा-या कार्यवाहींबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आले.
(हेही वाचा -यंदाच्या दिवाळीत गृह स्वप्न साकार होणार, MHADA च्या ३ हजार घरांची सोडत )
मुंबईत छोट्या व मोठ्या नाल्यांची सफाई पूर्ण
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीचा संदर्भ देऊन सांगितले की, यंदाचा मान्सून हा आज कारवारपर्यंत पोहोचला आहे. तसेच यंदाचा मान्सून हा ‘सामान्य मान्सून’ असणार असल्याचेही हवामान खात्याने कळविले असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहे. यावेळी त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नालेसफाईबाबत माहिती देताना पी. वेलरासू यांनी मुंबईत छोट्या व मोठ्या नाल्यांची पावसाळापूर्व सफाई ही पूर्ण झाली आहे. तर मिठी नदीची ९८ टक्के सफाई आतापर्यंत झाली असून, उर्वरित २ टक्के सफाई पुढील २ ते ३ दिवसात पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला महानगरपालिकेचे परिमंडळीय उप आयुक्त, विविध खात्यांचे उप आयुक्त, भारतीय नौदलाचे प्रतिनिधी, भारतीय हवामान खात्याचे प्रतिनिधी, पोलीस उप आयुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे, महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रतिनिधी, मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, जिल्हाधिकारी कार्यालये, तटरक्षक दल, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए. इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर आणि विविध खात्यांचे प्रमुख देखील या समन्वय बैठकीला उपस्थित होते.
५ तुकड्या पावसाळ्या दरम्यान मुंबईत कार्यरत
तसेच पावसाच्या पाण्याचा अधिक जलदगतीने निचरा व्हावा, याकरिता ६ ठिकाणी असलेली मोठी उदंचन केंद्रे आणि १० ठिकाणी असलेली छोटी उदंचन केंद्रे सुसज्ज आहेत. त्याचबरोबर विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार ४८७ पंपही बसविण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून राष्ट्रीय प्रतिसाद पथकाच्या ५ तुकड्या पावसाळ्या दरम्यान मुंबईत कार्यरत असणार आहेत. तसेच भारतीय सेना, भारतीय नौदल व तटरक्षक दल यांनाही सुसज्ज व सतर्क राहण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
खड्ड्यांसाठी कोल्डमिक्स
पावसाळ्या दरम्यान रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन विभाग स्तरावर पुरेशा प्रमाणात ‘कोल्डमिक्स’ साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच महानगरपालिकेच्या अखत्यारित नसणा-या रस्त्यांबाबत संबंधित संस्थांना सुसज्ज राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांना तक्रार करता यावी, याकरिता महानगरपालिकेच्या ८९९९-२२८-९९९ या ‘व्हॉट्सअप चॅटबॉट’ क्रमांकासह महानगरपालिकेच्या ‘अँड्रॉइड ॲप’ व संकेतस्थळावर देखील सदर सुविधा उपलब्ध असणार आहे.
येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेची आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा अधिक सुसज्ज असल्याची ग्वाही दिली. पावसाळ्या दरम्यान मच्छरांचा उपद्रव वाढू नये, यासाठी महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे दरवर्षीप्रमाणे विविध स्तरिय उपाययोजना राबविण्यात येत असल्याचीही माहिती अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली. तसेच कोविड बाबतही मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले
Join Our WhatsApp Community