पालिकेकडून अद्याप प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आरोग्यसेविकांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन सुरुच ठेवले. पालिकेने किमान वेतनवाढ टप्प्याटप्प्याने दिली जाईल असा प्रस्ताव आंदोलनकर्त्या परिचारिका संघटनेला दिल्याचे समजते. यावर शुक्रवार ३ जून २०२२ रोजी मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यासोबत बैठक होऊन चर्चा होणार आहे.
( हेही वाचा : सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हजारीपार)
या प्रशिक्षणाला परिचारिकांचा बहिष्कार राहील
पहिल्या दिवशी अंदाजे सातशे तर दुसऱ्या दिवशी हजारोंच्या संख्येने परिचारिका आझाद मैदानात आंदोलनात उतरल्या होत्या. काहीही कारणे देऊन टप्प्याटप्प्याने मिळणारी पगारवाढ नको, अशी भूमिका परिचारिकांनी मांडली. आम्हाला गुरूवारी इकबाल सिंग चहल यांच्याकडून बैठकीसाठी बोलावणे होते. मात्र बैठक झाली नाही. आम्ही बैठकीसाठी प्रतीक्षेत होतो, असेही परिचारिका म्हणाल्या. बैठकीत अंतिम निर्णय झाला नाही तर पावसाळी आजारांसाठी तयारी कशी करावी, या प्रशिक्षणाला परिचारिकांचा बहिष्कार राहील, असे परिचारिकांनी सांगितले. पालिका आरोग्य केंद्रातील परिचारिकांना प्रत्येक विभागात जाऊन पावसाळी आजारांचा प्रसार न होण्यासाठी औषधे प्रत्येक इमारत आणि घराला भेट देत नागरिकांना द्यायच्या असतात. गेली कित्येक वर्षे औषधे वाटपाचे काम परिचारिकांऐवजी आम्ही करत आहोत, त्याचा अतिरिक्त मोबदला तर सोडा, कामाची दखल ही म्हणावी तशी घेतली जात नाही, अशी व्यथा परिचारिकांनी मांडली.
Join Our WhatsApp Community