सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्माच्या नावाखाली मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांच्या मार्फत देशात विघातक कृत्य करण्याचा ‘लष्कर- ए- तैय्यबा’ डाव महाराष्ट्र एटीएसने उधळून लावला आहे. पुणे एटीएसने गेल्या आठवड्यात पुण्यातून जुनेद तर गुरुवारी जम्मू काश्मीरच्या किस्तवाडा येथून आफताब शाह याला अटक केली आहे. त्याच बरोबर कुलगाममधील हमिदुल्ला जरगर आणि उमर या दोघांना वॉन्टेड दाखविण्यात आले आहे. राज्यातील मुस्लिम तरुणांची धर्माच्या नावाखाली सोशल मीडियाच्या मार्फत माथी भडकावून त्यांचा स्लीपर सेल म्हणून राज्यात दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्याचा डाव परदेशात बसलेल्या लष्कर – ए – तैय्यबाच्या कमांडर यांचा होता अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र एटीएसने डाव उधळला
महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जम्मू-काश्मीर राज्यातील किस्तवाडा येथून २८वर्षीय आफताब शाह याला अटक करून गुरुवारी पुण्यात आणले. आफताब याचा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली आहे. २३ मे रोजी पुणे एटीएसने पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद जुनैद मोहम्मद अता हा आफताब याच्या संपर्कात होता. पुण्यातील दापोडी येथील एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात काम करणाऱ्या मोहम्मद जुनैद मोहम्मद अता यांच्या चौकशीत जम्मू आणि काश्मीरमधील आणखी तीन कथित दहशतवादयासोबत जुनैद थेट किंवा फोन-आधारित मेसेंजर ऍप्लिकेशनद्वारे संपर्कात होता.त्यापैकी आफताब याला किस्तवाडा येथून अटक करण्यात आली असून कुलगाममधील हमिदुल्ला जरगर आणि उमर यांना या प्रकरणात वॉन्टेड व्यक्ती म्हणून दाखविण्यात आले आहे.
जुनैदच्या अटकेनंतर, एटीएसने म्हटले होते की, लष्कर – ए- तैयब्बासाठी निधी गोळा करणे, भरती आणि शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी करणे तसेच स्लीपर सेल तयार करून त्यांना शस्त्र प्रशिक्षणासाठी तयार करणे या जवाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे एटीएसने म्हटले होते. जुनैदच्या अटकेनंतर, महाराष्ट्र एटीएस तपासत असलेल्या विविध डिजिटल लीड्सपैकी किमान पाच फेसबुक खाती आहेत जी तरुणांशी संवाद साधण्यासाठी आणि जातीय भावना भडकावून त्यांना प्रतिबंधित संघटनेत सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वापरली जात होती.
‘अन्सार गजावत-उल हिंद तौहीद’ या मेसेंजर आधारित गट
एटीएसच्या गुप्तचरांनी असा दावा केला आहे की, हमीदुल्ला जरगरने स्थापन केलेल्या ‘अन्सार गजावत-उल हिंद तौहीद’ या मेसेंजर आधारित गटाची चौकशी केली आहे ज्यामध्ये २०२१ पासून अनेक देशविरोधी दहशतवादी कारवायांवर चर्चा आणि योजना आखण्यात आली होती आणि गटात सामील सदस्यांचे कथित ब्रेन वॉश करण्यात आले होते. या ग्रुपचा भाग असलेला जुनैद हा जरगर, शाह आणि उमर यांच्या थेट संपर्कात होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘अन्सार गजावत-उल हिंद’ हे अल कायदाशी संलग्न असलेल्या एका गटाचे नाव आहे, लष्कर ए तैयब्बा दुफळीशी संबंध असल्याची माहिती आहे. संशयितांचा ‘अन्सार गजावत-उल हिंद’ या गटाशी काही संबंध आहे का, याची चौकशी केली जात असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community