कर्करोग रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी घरे, मुला-मुलींसाठी, नोकरी करणा-या महिलांसाठी वसतिगृह, पशुवैद्यकीय रुग्णालयापाठोपाठच आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने वृद्धाश्रम बांधण्यासाठी तीन जागा निश्चित केल्या आहेत. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून, लवकरच यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
परवडणा-या घरांची निर्मिती करणा-या म्हाडाने सामाजिक बांधिलकी राखून, विविध घटकांसाठी निवारा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने कर्करोग निवा-यासाठी 1000 घरे उपलब्ध करुन दिली आहेत. वांद्रे पश्चिम येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी स्वारस्य निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आता मुंबईतील जेष्ठ नागरिकांच्या निवा-याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई मंडळ सरसावले आहे.
( हेही वाचा: रेल्वेची नवी सुविधा: आता तुमचं स्टेशन आल्यावर रेल्वे करणार तुम्हाला ‘वेकअप काॅल’ )
होणार काय?
मंडळाने वृद्धाश्रमांसाठी चारकोप,घाटकोपर आणि अन्य एका ठिकाणी जागाही निश्चित केली आहे. हे वृद्धाश्रम नेमके कसे असेल तेथे कोणत्या सुविधा असतील यासाठी किती खर्च येईल याबाबत अभ्यास करण्यात येत असून लवकरच सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी आता अधिक काही सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community