शिव योग केंद्राला अल्प प्रतिसाद; संस्था पुढे येत नसल्याने मानधनावर प्रशिक्षकांची करणार निवड

160

मुंबई महापालिकेने जाहिर केलेल्या शिव योग केंद्र योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून ३ जून पर्यंत मुदतवाढ देऊनही केवळ २४ विभागांमध्ये केवळ ७ ते ८ अर्जच केंद्र स्थापनेसाठी सादर झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा ही केंद्र सुरु करण्यासाठी योग प्रशिक्षण संस्था तसेच प्रशिक्षकांना विभागीय सहायक आयुक्तांशी तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.विशेष म्हणजे संस्थांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशिक्षकांची निवड करून त्यांना प्रति सत्र १ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : मास्क सक्ती नाही; गर्दी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरा – राजेश टोपे)

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य संघटनेच्या संकल्पनेत शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्यास महत्त्व दिले आहे. सद्यस्थितीत रोजच्या दैनंदिन कामातील धावपळ व ताणतणाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तसेच नैराश्य यासारखे जीवनशैलीशी निगडीत आजारांचे प्रमाण वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, तसेच जीवनशैलीशी निगडीत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इ. आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधोपचारासोबतच आरोग्यदायी जीवनशैली व योगासनाचा प्रचार आणि प्रसार झाल्यास त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. मुंबईतील नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ‘शिव योग केंद्र’ हा महत्वाकांक्षी उपक्रम सर्व विभागात सुरू करण्याचा निर्णय घेतला.

महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये येत्या जून २०२२ पासून शिव योग केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी किमान ३० नागरिकांच्या समुहाने आपल्‍या विभाग कार्यालयाकडे निर्धारित पद्धतीनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी २० मे २०२२ रोजी दिली. यासाठी ३१ मे पर्यंत अर्ज सादर करण्याणे बंधनकारक होते, परंतु या कालावधी केवळ चार ते पाचच अर्ज प्राप्त झाले होते, त्यामुळे ३ जून पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ सात ते आठच अर्ज प्राप्त झाले आहे.

संस्था न आल्यास प्रशिक्षित योग शिक्षकाची होणार निवड

त्यासाठी इच्छुक योग प्रशिक्षण संस्था/ योग प्रशिक्षकांनी आपल्याजवळील विभागातील सहाय्यक आयुक्त अथवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिव योग केंद्रांकरिता नियुक्ती करण्यासाठी इच्छुक योग प्रशिक्षण संस्था / योग प्रशिक्षकांची निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये विभाग स्‍तरावर निवड समितीमार्फत योग संस्थेची अथवा योग संस्था उपलब्ध न झाल्यास प्रशिक्षित योग शिक्षकाची निवड करण्यात येईल. योग संस्थांची किंवा प्रशिक्षित योग शिक्षकांची निवड करण्‍यात येईल,असे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी स्पष्ट केले.

निवड झालेली संस्था तथा योग प्रशिक्षक यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त सामंजस्य करार करतील. एकाहून अधिक योग संस्था अथवा योग प्रशिक्षक निकषानुसार पात्र ठरल्यास, प्रशिक्षक नेमण्याची संस्थेची क्षमता, संस्थेचा व प्रशिक्षकांचा अनुभव, मुलाखत व प्रात्यक्षिकाचे मूल्यांकन याआधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. ज्या क्रमाने योग केंद्रे कार्यान्वित होतील, त्याप्रमाणे गुणवत्ता यादीतील क्रमानुसार संस्थेस तथा प्रशिक्षकास योग केंद्र निश्चित करून देण्यात येईल. निवड करण्यात आलेले योग प्रशिक्षक , योग केंद्र जवळच्‍या विभागातील असल्‍यास त्‍यांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. शिव योग केंद्रावर प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकास प्रतिसत्र १,००० रुपये (रुपये एक हजार फक्‍त) इतके मानधन देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे डॉ संजीव कुमार यांनी जाहिर केले. त्यामुळे प्रतिसाद न मिळाल्याने आता प्रशिक्षकांची मानधनावर नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे स्पष्ट होते.

योग प्रशिक्षण केंद्रांची पात्रता

योग संस्‍था किमान दोन वर्षे योगा प्रमाणन मंडळ (Yoga Certification Board -YCB / Quality Control Of India – QCI) किवा इंडियन योगा असोसिएशन (Indian Yoga Association – IYA) मध्ये नोंदणीकृत असावी. तसेच सदर संस्था प्रशिक्षित योग शिक्षक पुरविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. प्रशिक्षक हा नामांकीत योग संस्थाकडून प्रमाणित (Certified) आहे किंवा नाही तसेच शासन नियमांनुसार कॉमन योगा प्रोटोकॉलमध्ये किमान ३ वर्षाचा प्रशिक्षणांचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र अथवा भारत सरकारचे Recognition of Prior Learning (RPL) प्रमाणपत्र तपासून खात्री करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.