राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेने आता सावध पाऊल उचलले असून येत्या सोमवारी सर्व आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना सूचना करून सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या हालचाली केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली
राज्यसभेच्या निवडणुकीत सातवा उमेदवार रिंगणात उभा राहिल्याने निवडणुकीची चुरस निर्माण झाली आहे. या चुरसीमुळे घोडेबाजाराची चर्चा जोरात सुरु आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवरच घोडेबाजाराचा आरोप केला. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचा आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याचा आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पक्षांच्या आमदारांची सोमवारी सहा वाजता बैठक बोलावली आहे. तिथूनच सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले जाईल, अशी चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेने ही सावध भूमिका घेतली. येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
(हेही वाचा आजचे सरकार बाळासाहेबांचे स्वप्न होते! संजय राऊतांचा खळबळजनक दावा)
Join Our WhatsApp Community