राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्ये घोषित!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय

162

राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. वन क्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनवर्सन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

वन क्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा. त्यांच्या समस्याकडे लक्ष द्या. वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने विचार करा. वनक्षेत्रातील विकास कामांबाबत प्रस्ताव आणताना, त्यांचा सर्व अंगानी विचार व्हावा. केवळ सर्वेक्षणाच्या मान्यतेनंतर कधीकधी थेट प्रकल्पांना मान्यता मिळाल्याप्रमाणे कामे सुरु होतात. तसे होऊ नये याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील ८ क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची भर पडल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. जायकवाडी पाणी पुरवठा योजनेच्या कामांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आवर्जून निर्देश दिले. तसेच या योजनेच्या जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात उद्भव विहीर व पाणी पुरवठा योजनेच्या कामांसाठी तत्काळ मान्यता मिळावी यासाठी कार्यवाहीला गती देण्यात यावी असेही सांगितले.

(हेही वाचा – IRCTC: ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी )

दोडामार्गातील वनहत्तींच्या समस्येवर तोडगा

यावेळी बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हयातील दोडामार्ग मधील वन्यहत्ती समस्येबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दोन महिन्यात अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या परिसरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आजरा, चंदगड, तिलारी या परिसरातील हत्तींचा प्रवेश बंद करण्याबाबत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा झाली.

राज्यातील १२ संवर्धन राखीव क्षेत्र

घोषित करण्यात आलेल्या १२ संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (६६.०४ चौ.कि.मी), अलालदारी (१००.५६ चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (८४.१२ चौ.कि.मी), मुरागड (४२.८७ चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (९६.९७ चौ.कि.मी), इगतपुरी (८८.४९९ चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (४७.६२ चौ.कि.मी), रोहा (२७.३० चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (२८.४४ चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (१.०७ चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (५.३४ चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (१०३.९२ चौ.कि.मी), यांचा समावेश आहे.

राज्यात नवीन ३ अभयारण्य क्षेत्र

मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित

राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर – सुपे (५.१४५ चौ.किमी.), बोर (६१.६४), नवीर बोर (६०.६९), विस्तारित बोर (१६.३१), नरनाळा (१२.३५), लोणार वन्यजीव अभयारण्य (३.६५), गुगामल राष्ट्रीय उद्यान (३६१.२८ चौ.कि.मी), येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य (२२.३७), नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य (२९.९०), देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य (२.१७) यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.