सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीने वातावरण तापले आहे. राज्यसभेसाठी ७ व्या उमेदवारासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे. अशातच राज्यातील काही आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांचे मतदान राज्यसभा निवडणुकीत कसे करावे, असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाला पडला आहे, त्यासाठी काय निकष असावेत, अशी विचारणा थेट लेखी पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनाबाधित आहेत, याशिवाय अन्य काही आमदार कोरोनाने बाधित आहेत, तर दुसरीकडे माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक सध्या कारागृहात आहेत. त्यांना मतदान कसे करता येईल, अशी विचारणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. पोलिंग एजंट संदर्भात काय कार्यवाही करावी, अशी विचारणा केली आहे. सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढत आहे. त्याचा थेट फटका राज्य सभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यातून मार्ग काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला आवाहन केले आहे.
(हेही वाचा Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?)
जुलै ते ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका
राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होणार, असा अंदाज आहे. राज्यातील रखडलेल्या 14 महापालिकांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यावर प्रशासन नेमण्यात आला आहे. कारण कोरोनामुळे या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका आणखी रखडल्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यावर अखेरीस राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली, परंतु आता कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे, अशा वातावरणात निवडणुका कशा घ्यायच्या, अशी विचारणा राज्य निवडणूक आयोगाने लेखी पत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Join Our WhatsApp Community