प्रदूषणातील वाढ आणि पेट्रोल-डिझेलची वाढलेली मागणी, दररोज वाढणारे इंधनाचे दर, यावर शाश्वत पर्याय म्हणून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या तीन आठवड्यांत ७ सीटर ई-रिक्षा तयार केली आहे. आठ तासांच्या चार्जिंगवर ही ई-रिक्षा ८० किलोमीटर चालते. विद्यार्थ्यांनी स्क्रॅप मटेरियलपासून ही रिक्षा तयार केली आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सातत्याने विविध विषयांवर संशोधन प्रकल्प तयार करतात. कारखान्यांमधून निघालेल्या राखेपासून विद्यार्थ्यांनी स्टाईल्स तयार केल्या आहेत. तसेच टाकाऊ प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉकदेखील तयार केले आहेत.
( हेही वाचा : कॉफी मशीनचा शोध लावणाऱ्या अँजेलो मोरिओन्डोसाठी Google ने साकारले अनोखे Doodle!)
भविष्यात ही ई-रिक्षा आणखी अत्याधुनिक करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे इंधनाच्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्यांना परवडेल अशी या ई-रिक्षाची किंमत असेल असे संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले.
या ई-रिक्षाची वैशिष्ट्ये
- ६ ते ८ तासात होईल बॅटरी चार्जिंग.
- चार्जिंगनंतर ८ युनिट वीजेवर चालते ८० किमी ई-रिक्षा.
- चालकासह सातजण करू शकतात एकत्रित प्रवास.
- ई-रिक्षावर बसवले जाणार सोलार सेल.
- प्रतिकिलोमीटर १ ते सव्वा रुपयांचा खर्च.
- रिक्षा बनवण्यासाठी ९० हजारांचा खर्च.