मुंबई-गोवा हायवेचे चौपदरीकरण करण्याच्या मार्गात चिपळूणमधील परशुराम घाट ‘दगड’ बनला आहे. कारण पावसाळा कधीही सुरु होईल, अशी स्थिती असतानाही परशुराम घाटाचे काम मात्र अवघे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हा घाट मृत्यूचा सापळा बनेल, अशी स्थिती आहे.
डोंगर ठिसूळ बनल्याने घाट धोकादायक
कोकणात पाऊस कायम जास्त कोसळत असतो. विशेष म्हणजे डोंगराळ भागातून हा पाऊस कोसळतो तेव्हा भूस्खलन होत असते आणि गंभीर अपघात घडतो. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात परशुराम घाटाचे काम डोक्याला ताप बनला आहे. मागील महिनाभर परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता, तरीही या घाटाचे काम आतापर्यंत केवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. या ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी डोंगर फोडला आहे. विशेष म्हणजे या डोंगरात कातळ नाही, बहुतांश मातीचा डोंगर असलेला हा घाट फोडल्यामुळे तो आणखी ठिसूळ बनला आहे. अशा स्थितीत जर यंदाच्या वर्षी मागील वर्षीप्रमाणे पाऊस झाला तर हमखास येथील माती खाली येईल. अर्थात भूस्खलन होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा घाट सुरु ठेवणे म्हणजे हा घाट मृत्यूचा सापळा बनेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
(हेही वाचा Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?)
सिमेंट कॉंक्रेटीकरणाच्या भिंतीवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे घाटातील टोकावर परशुराम गावाकडे परशुराम घाटाचा डोंगर बऱ्यापैकी खोदला आहे. मोठ मोठे दगड खाली निखळून पडले आहेत. कारण येथील डोंगर बहुतांश मातीचा आहे, त्यामुळे डोंगर अधिक ठिसूळ बनला आहे. त्याला पर्याय म्हणून ज्या ठिकाणी हा घाट कोसळण्याची भीती आहे, त्या ठिकाणी सिमेंटच्या भिंती बांधण्यात येत आहे. मात्र हे कॉंक्रेटीकरणही कोसळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. यासंबंधी बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही याविषयी चिंता व्यक्त केली आहे. घाटाचे बांधकाम फार मंद गतीने सुरु आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हा घाट प्रवासासाठी धोकादायक आहे, असे आमदार जाधव म्हणाले.
Join Our WhatsApp Community