उन्हाळ्याची सुट्टी संपून आता विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची ओढ लागली आहे. नव्या वर्गात जाताना सर्व शालेय सामुग्री नव्याने विकत घेतली जाते. मात्र कोरोना महामारी, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य पालकांनी आपल्या पाल्यासाठी नवी पुस्तके खरेदी न करता जुनीच पुस्तके खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी पुस्तक विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या पुस्तकांबाबत विचारणा होत आहे.
( हेही वाचा : राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे एकूण व्हाल थक्क)
जुनी पुस्तके खरेदी करण्यावर भर
डोंबिवली शहराचा विचार केला तर शहरात सुमारे 105 पुस्तक विक्रेत्यांची दुकाने आहेत. मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांसह पालक पुस्तक खरेदी करण्यासाठी येत असतात. या विषयाबाबत डोंबिवलीतील विनीत बुक डेपोचे पुस्तक विक्रेते निशिकांत मोडक यांनी सांगितले की, सर्वच शैक्षणिक साहित्य म्हणजे पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, कलर्स, पेपर आदी साहित्यांच्या किमतीत सुमारे 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. पुस्तकांच्या किंमती वाढल्या असल्या तरी नवीन पुस्तकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. देशात कागदाचा तुटवडा असल्याने पुस्तकांची प्रिंटिंग कमी होत आहे. पुस्तकांच्या दरवाढीमुळे पालकांना पुस्तके खरेदी करतांना विचार करावा लागत आहे. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिली ते सातवी शासनातर्फे मोफत पुस्तके मिळत असली तरी त्यांना इतर शालेय समान विकत घ्यावे लागते. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसह इतर साहित्य विकत घ्यावे लागते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या पालकांना आर्थिक चणचण असल्याने त्यांनी आता जुनी पुस्तके खरेदी करण्यावर भर असल्याचे दिसून येत आहे. असे पुस्तक विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community