विधान परिषद निवडणूक : काँग्रेस, शिवसेना, भाजपची यादी तयार, राष्ट्रवादीची गुलदस्त्यात!

143

राज्यसभेची निवडणूक २ दिवसांत होणार आहे, त्याआधीच विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी निश्चितही केली. मात्र राष्ट्रवादीने अद्याप त्यांच्या उमेदवाऱ्यांची यादी निश्चित केली नाही.

काँग्रेसकडून हंडोरे, जगताप! 

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर दुसऱ्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.

(हेही वाचा राज्यसभा निवडणूक : समाजवादीची दोन मते शिवसेनेला मिळणार, बविआचे काय?)

भाजपने पंकजा मुंडेंना नाकारले  

राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. प्रसाद लाड हे पाचवे उमेदवार असणार आहेत.

शिवसेनेकडून अहिर, पाडवी यांना संधी

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांना संधी देण्यात येणार आहे. आमश्या पाडवी हे शिवसेनेचे नंदूरबार जिल्हा प्रमुख आहेत. तर सचिन अहिर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता.

संख्याबळ किती?

विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे 4, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. म्हणजे राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 27 मतांची गरज उमेदवाराला असते. भाजपकडे मित्रपक्षांसह 113 आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, शिवसेनेकडे 56 तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.